Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाला बँक परवान्यासाठी नव्याने अर्ज करावा लागणार

By admin | Updated: May 26, 2014 00:44 IST

भारतीय पोस्ट खात्याला बँकिंग परवाना मिळविण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट खात्याला बँकिंग परवाना मिळविण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या एका ताज्या दिशानिर्देशांनुसार डाक विभागाला नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता आहे. परवान्यासाठी आगामी काही महिन्यांत नवे दिशानिर्देश जारी झाल्यानंतर डाक विभागासह अन्य कंपन्यांना नव्याने अर्ज प्रक्रियेत सहभाग घ्यावा लागेल. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात आयडीएफसी आणि बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस यांना बँकिंग परवाना दिला होता. दुसरीकडे डाक विभागासह २५ कंपन्या बँकिंग परवाना मिळविण्यात अपयशी ठरल्या होत्या. परवाना न मिळालेल्या अन्य कंपन्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील आयएफसीआय, खासगी क्षेत्रातील अनिल अंबानी व आदित्य बिर्ला समूह यांच्याशिवाय बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स, रेलिगेअर इंटरप्रायजेस आणि श्रीराम कॅपिटल यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यवर्ती बँक बँकिंग क्षेत्रातील प्रवेश खुला करण्याच्या बाजूचे असल्याचे सांगितले आहे. यादृष्टीने त्यांनी सी. रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त केली होती. सध्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँक तथा खासगी क्षेत्रातील २२ बँका कार्यरत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)