Join us

आॅनलाईन खरेदीमुळे पोस्टाच्या नफ्यात वाढ

By admin | Updated: December 5, 2014 02:14 IST

आॅनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

राम देशपांडे, अकोला आॅनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आॅनलाईन मार्केटिंगमुळे संबंधित कंपन्यांसोबतच टपाल खात्यालाही फायदा होत असून, पोस्टाच्या ग्राहक संख्येत वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे.आॅनलाईन विक्रीच्या व्यवसायात नामांकित कंपन्या उतरल्या असून, विश्वसनीयता, गुणवत्ता आणि वाजवी किमतीमुळे आॅनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिसेंबर २0१३ पासून कंपन्यांनी ‘कॅश आॅन डिलिव्हरी’चा (घरपोच वस्तू मिळाल्यानंतर किंमत अदा करणे) पर्याय खुला केल्याने ग्राहकांची संख्या आणखी वाढली. ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचविण्यासाठी आॅनलाईन रिटेल कपन्यांकडून खासगी कुरिअर कंपन्यांसोबतच टपाल खात्याचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पोस्टाच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती वरिष्ठ डाक अधिकाऱ्यांनी दिली. आॅनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे डाक विभागाला नेमका किती फायदा झाला, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली, तरी अलीकडच्या काळात खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पोस्टाने पाठविण्यात येणाऱ्या पार्सल्सची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास येत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. खासगी कंपन्यांच्या कुरिअर सर्व्हिसमुळे पोस्टामार्फत पाठविल्या जाणाऱ्या पार्सल्सची संख्या मध्यंतरी रोडावली होती. मात्र, आॅनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवसायामुळे पोस्टाला पुन्हा ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. खासगी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातूनही कंपन्या आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पाठवितात. मात्र, देशात जवळपास दीड लाख पोस्ट आॅफिसेसचे जाळे, अगदी गावपातळीवर असलेली यंत्रणा आणि विश्वासार्हता लक्षात घेता, पोस्टाला प्राधान्य दिले जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आॅनलाईन खरेदीच्या वाढत्या फॅडमुळे अधिकाधिक ग्राहक टपाल खात्याशी जोडले जात आहेत. हीच परिस्थिती राहिली तर, भविष्यात पोस्टाचा कायापालट होईल आणि वाढत्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी पोस्ट आॅफिसेसमध्ये ‘किआॅक्स’ (काऊंटर) उभारावे लागतील, असा विश्वास डाक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.