Join us

यंदा ५0 टन सोन्याची आयात होण्याची शक्यता

By admin | Updated: April 16, 2015 23:47 IST

व्यवसाय आणि नफा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या खनिज आणि धातू व्यापार महामंडळाला (एमएमटीसी) सोन्याच्या आयातीत यंदा थोडी ढील देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : व्यवसाय आणि नफा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या खनिज आणि धातू व्यापार महामंडळाला (एमएमटीसी) सोन्याच्या आयातीत यंदा थोडी ढील देण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून यंदा ५0 टनांपर्यंत सोने आयात होऊ शकते. गेल्या वर्षी २५ टन सोन्याची आयात झाली होती.एमएटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेद प्रकाश यांनी पत्रकारांना सांगितले की, सोन्यावर अनेक प्रकारची बंधने लादण्यात आल्यामुळे आमच्या आयातीत मोठी कपात झाली आहे. तथापि, आता सोने आयात धोरणात थोडी ढील देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा सोन्याची आयात ३0 ते ६0 टनांच्या दरम्यान राहू शकते. त्याचबरोबर यंदा चांदीची आयात २00 टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १५0 टन चांदी आयात करण्यात आली होती. आयात कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क वाढविले होते. त्याचबरोबर आयात केलेल्या सोन्यापैकी २0 टक्के सोने निर्यात करण्याचे बंधन घालण्यात आले होते. ८0:२0 असे नाव या धोरणाला देण्यात आले होते. हे धोरण रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये संपविले. १८ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने सोन्याचे शिक्के आणि पदकांच्या आयातीवरील प्रतिबंध हटविला. दागिने निर्मात्यांना सोने उसने देण्याची मुभा बँकांना देण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)