जयपूर : अर्थव्यवस्थेचा विकासदर आठ टक्क्यांपेक्षा अधिक राहील असा आशावाद नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केला. सकल घरेलु उत्पादनाचा वृद्धीदर पहिल्या तिमाहीत ७.२ टक्के राहिला आहे, तर दुसऱ्या तिमाहीत तो ७.४ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद पनगढिया हे उत्साहित आहेत. मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर २०१३ -१४ मध्ये ८.३ टक्के होता, तर २०१४-१५ मध्ये तो ७.३ टक्के होता. आतापर्यंत फक्त चार अर्थव्यवस्था सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान आणि चीन हे देश दीर्घ काळापर्यंत ८ ते १० टक्क्यांपर्यंत विकास दर कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत. कृषी आणि सेवा क्षेत्रातील विकासदर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत पनगढिया यांनी व्यक्तकेले. विकासदर वाढविण्यासाठी निर्यातीत वाढ, सेवा क्षेत्रात सुधारणा, कृषी क्षेत्रातील मजुरांना उद्योग क्षेत्रात संधी देणे, गरिबी दूर करण्यासाठी मजुरी चांगली द्यावी आणि वेगाने शहरीकरण या मुद्यांवर भर द्यावा लागेल. नीती आयोगाची भूमिका ही सहकार्याची आहे, असेही पनगढिया म्हणाले. कृषी क्षेत्रातील सर्वात चांगला काळ म्हणजे १९८० च्या दशकातील होता, असे सांगून ते म्हणाले की, भविष्यात जीडीपीतील कृषी क्षेत्राचा हिस्सा घटणार आहे.
विकासदर ८ टक्क्याहून अधिक राहण्याची शक्यता
By admin | Updated: December 24, 2015 00:21 IST