Join us  

पेट्रोल, डिझेलच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 7:15 AM

उत्पादक देशांची बैठक : क्रूड आॅइलचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय; इराण झुगारणार अमेरिकेचे निर्बंध

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत घट होत असली तरी लवकरच इंधन दर पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. तेल निर्यातदार देशांनी आता उत्पादन कमी करण्याचे ठरविले आहे. तसे झाल्यास इंधनाचे दर निश्चितच वाढतील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सकाळी उलाढाल सुरू होताच ब्रेंट क्रूड आॅइलचा प्रति बॅरल दर ७0.६९ डॉलर होता. तो दुपारपर्यंत ७१.६१ डॉलर झाला. म्हणजेच आॅइलचे दर वाढू लागल्याचे आता जाणवू लागले आहे.

अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने तसेच त्या देशाकडून इंधन घेणाऱ्या देशांवरही निर्बंध लादण्याचा इशारा दिल्याने इंधन दरात मोठी वाढ होण्याची शक्यता होती. इराणशी व्यापारी संबंध कायम ठेवणाºया देशांवर बहिष्कार घालण्याची धमकीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. मात्र नंतर अमेरिकेने भारत, चीन, जपानसह आठ देशांना निर्बंधांतून वगळले. तसेच अमेरिका, सौदी अरेबिया आणि रशिया यांनी आपले खनिज तेलाचे उत्पादन वाढवले. त्यामुळे भारतात जवळपास सलग २0 दिवस पेट्रोल, डिझेलचे दर घटले. एप्रिलनंतर पहिल्यांदाच शुक्रवारी खनिज तेल ७0 डॉलर प्रति बॅरलच्या खाली गेले होते. अर्थात हा दिलासा तात्पुरता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक बाजारात इंधनाच्या किमती कमी होत असल्याने तेल आयातदार देशांना दिलासा मिळाला असला तरी यामुळे तेलाची निर्यात करणाºया देशांच्या महसुलात घट झाली. त्यामुळेच आता तेलाचे उत्पादन कमी करण्याबद्दल चर्चा करण्यासाठी सौदी अरेबिया, इराक, इराण या ओपेक देशांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला रशियाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दरम्यान, अमेरिकेचे निर्बंध असलेल्या इराणने आपण आपल्याकडील क्रूड आॅइल इतर देशांना निर्यात करणाºया काही कंपन्यांना विकण्यास देऊ , असे म्हटले आहे. अमेरिकेचे निर्बंध झुगारून तसे करण्याचे इराणने ठरविले आहे.महसूलातील घट टाळण्यासाठीतेलाच्या किमती अशाच कमी होत राहिल्यास २0१४-१६ सारखी परिस्थिती निर्माण होईल आणि आपल्या महसुलात प्रचंड घट होईल, असे मत सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले.त्यानंतर सौदी अरेबियाने लगेचच आपण तेलाचे उत्पादन कमी करीत असल्याचे स्पष्ट केले. सौदी अरेबियापाठोपाठ अन्य देशही याच पद्धतीने निर्णय घेतील, असे दिसत आहे. परिणामी भारताला क्रूड आॅइलसाठी अधिक रक्कम मोजावी लागेल आणि त्याचा परिणाम पेट्रोल व डिझेलच्या किमतीवर नक्कीच होईल.

टॅग्स :पेट्रोल पंपपेट्रोल