राजरत्न सिरसाट, अकोलापश्चिम विदर्भात यावर्षी ३ लाख ९५ हजार हेक्टरवर तूर या डाळवर्गीय पिकाची पेरणी झालेली आहे. परंतु, कमी पावसाचा डाळवर्गीय पिकावर परिणाम झाला असून, फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी न मिळाल्याने कोरडवाहू क्षेत्रात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही परिस्थिती संपूर्ण राज्यातच आहे.पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. गतवर्षी ३ लाख ६३ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली होेती. यावर्षी ३ लाख ९५ हजार १०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी पश्चिम विदर्भात १ लाख १० हजार ५०० मेट्रिक टन तुरीचे उत्पादन झाले होते. उत्पादकता हेक्टरी सरासरी ३ क्ंिवटल ४ किलो होती. गतवर्षी क्षेत्र कमी होते. यावर्षी क्षेत्र वाढले; परंतु या पिकाला सुरुवातीपासूनच पूरक पाणी मिळाले नाही. फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेत या पिकाला पाण्याची निंतात गरज होेती. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये हे पीक फुलोऱ्यावर येते, तर डिसेंबरमध्ये शेंगा येण्याची अवस्था असते. यावर्षी पाऊसच कमी झाला आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने तूर पिकाला पुरेसे पाणी मिळाले नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा होती, त्यांनी पाणी देऊन या पिकाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे तूर पीक चांगले असले, तरी अपेक्षित उत्पादन तेथेही अशक्य असल्याचे या पिकाच्या तज्ज्ञांचे मत आहे.
तुरीचे उत्पादन घटणार साठ टक्क्यांच्या वर!
By admin | Updated: December 20, 2015 22:33 IST