Join us  

या सहा राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 10:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रांचीमध्ये देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना असलेल्या आयुष्यमान भारतला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रांचीमध्ये देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना असलेल्या आयुष्यमान भारतला सुरुवात केली आहे. या अंतर्गत 10 कोटी कुटुंबीयांतील 50 कोटी लोकांना 5 लाखांचा कॅशलेस आरोग्य विमा दिला जाणार आहे. याला पंतप्रधान मोदींच्या नावे मोदी केअरही संबोधलं जातं. देशातील 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेचा लाभ देणारी आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी योजना आहे.या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या संपूर्ण युरोपीय संघाच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या तीन देशांची एकूण लोकसंख्या जोडली तरी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या जवळपास जाणारी असेल. परंतु या योजनेचा सहा राज्यांना लाभ मिळणार नाही. या सहा राज्यांमध्ये तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्ली, केरळ आणि पंजाबचा समावेश आहे. आता देशातल्या 29 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधल्या 445 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू झाली आहे.आयुष्यमान योजना लागू न झालेल्या राज्यांबरोबर केंद्र सरकारचा करार झाला नसल्याची सबब नरेंद्र मोदींनी सांगितली आहे. या योजनेवरून सहा राज्यांतील सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे या राज्यांना योजनेतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तसेच या राज्यांबरोबर करार झाल्यास तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्ली, केरळ आणि पंजाबला त्याचा फायदा होणार आहे. काय आहेत वैशिष्ट्ये....

  • या योजनेशी जोडली गेलेली व्यक्ती कोणत्याही राज्यात या योजनेचा लाभ घेऊ शकेल. 
  • आतापर्यंत देशभरातील 13 हजारांवर रुग्णालये जोडली गेली आहेत. 
  • कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत, मधुमेहासह एकूण 1300 पेक्षा जास्त आजारांवर उपचार होणार आहे.
  • गंभीर आजारांवर केवळ सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयांमध्येही उपचार होतील.
  • एकूण 5 लाखांपर्यंत खर्चाची तरतूद राहणार असून तपासणी, औषधे आणि रुग्णालयात दाखल होण्यासह त्यापूर्वीचा खर्चही समाविष्ट असेल. आधीपासून कोणताही आजार असेल तर त्यावरील खर्चही जोडला जाईल.
  • 14555 या नंबरवर फोन करून नजीकच्या सामान्य सेवा केंद्रातून या योजनांची माहिती मिळवता येईल.
  • मोदींनी रांचीमध्ये 10 वेलनेस सेंटर्सचा शुभारंभ केला. झारखंडमध्ये अशी 40 केंद्रे कार्यरत असून, देशभरातील संख्या 2300च्या घरात गेली आहे.
टॅग्स :आयुष्मान भारत