Join us  

पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 1:44 AM

६५ दिवसांची विश्रांती संपली : पेट्रोल १५ तर डिझेल १८ पैशांनी महागले

नवी दिल्ली : चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथील विधानसभा निवडणुका संपताच सरकारी मालकीच्या तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात मंगळवारी वाढ केली. त्यामुळे पेट्रोल १५ पैशांनी, तर डिझेल १८ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.५५ रुपये, तर डिझेल ८०.९१ रुपये लिटर झाले, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे. प्रत्येक राज्यात व्हॅटचा दर वेगळा असल्यामुळे इंधन दरातही तफावत आहे.

तेल वितरण कंपन्यांशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील दोन महिन्यांत भारताचा कच्च्या तेलाचा खरेदी दर ७ टक्क्यांनी वाढून प्रतिबॅरल ४,८७४.५२ रुपये झाला आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झाले नाही, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत राहतील. मागील काळातील तोटा दरवाढीच्या माध्यमातून भरून काढला जाईल.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर २७ फेब्रुवारीपासून ६६ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आले नव्हते. याआधीची शेवटची दरवाढ १५ एप्रिल रोजी झाली होती. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला. त्यामुळे सध्या कंपन्यांना इंधनांच्या विक्रीवर प्रतिलिटर सुमारे ३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महिनाभरापूर्वी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी डॉलरच्या तुलनेत विनिमय दर ७२.२९ रुपये होता. तो आता ७४.१८ रुपये झाला आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर ८ डॉलरने वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर मंगळवारी ६७.६४ डॉलर प्रतिबॅरल होते. भारतात वापरल्या जाणाऱ्या खनिज तेलापैकी ८० टक्के तेल आयात केले जाते. 

याआधीची दरवाढ १५ एप्रिल रोजी झाली होती. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला. त्यामुळे सध्या कंपन्यांना इंधनांच्या विक्रीवर प्रतिलिटर सुमारे ३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर ८ डॉलरने वाढले आहेत. त्यामुळे ही दरवाढ अपरिहार्यच होती.

टॅग्स :पेट्रोलडिझेल