Join us  

Petrol, diesel: पेट्राेल, डिझेलच्या किमती ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर; सात आठवड्यात २६ वेळा दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 8:58 AM

पेट्राेलची शंभरी ओलांडणारे बंगळुरू तिसरे. दिल्लीतही पेट्राेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत पेट्राेलचे दर ९६.९३ रुपये तर डिझेल ८७.६९ रुपये प्रति लिटर झाले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पेट्राेल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. तेल वितरण कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलची अनुक्रमे २७ आणि २८ पैसे दरवाढ केली आहे. दरवाढीनंतर मुंबई आणि हैदराबाद पाठाेपाठ बंगळुरूमध्ये पेट्राेल ने शंभरी गाठली आहे. पेट्राेलची शंभरी ओलांडणारे बंगळुरू हे तिसरे महानगर ठरले आहे. 

गेल्या सात आठवड्यातील ही २६ वी दरवाढ आहे. दरराेज हाेणाऱ्या दरवाढीमुळे इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत.  पेट्राेलची शंभरी गाठलेले मुंबई हे २९ मे राेजी पहिले शहर ठरले हाेते. मुंबईत पेट्राेलचे भाव १०३.०८ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर एक लिटर डिझेलसाठी ९५.१४ रुपये माेजावे लागत आहेत. बंगळुरूमध्ये पेट्राेलचे दर १००.१७ रुपये आणि डिझेल ९२.९७ रुपये प्रति लिटर झाले आहेत. 

दिल्लीतही पेट्राेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत पेट्राेलचे दर ९६.९३ रुपये तर डिझेल ८७.६९ रुपये प्रति लिटर झाले आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, ओडीशा, बिहार, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख येथे पेट्राेल ने शंभरी गाठली आहे. 

श्रीगंगानगर येथे सर्वात जास्त दरदेशात सर्वात महाग पेट्राेल राजस्थानातील श्रीगंगानगर येथे १०८.०८ रुपये प्रति लिटर आहे. कच्च्या तेलाचे दरही सुमारे ७३ डाॅलर्स प्रति बॅरलपर्यंत वाढले आहेत. लसीकरण, काेराेनाच्या परिस्थितीत सुधारणा इत्यादी सकारात्मक वातावरणामुळे मागणीत आणखी वाढ हाेण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात.

टॅग्स :पेट्रोलडिझेल