Join us  

जीवाला घोर लावणाऱ्या ओमायक्रॉनचा 'असाही' परिणाम; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:45 PM

इंधन दरवाढीतून दिलासा मिळण्याची दाट शक्यता; आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात घसरण

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे सगळेच देश सतर्क झाले आहेत. एका बाजूला ओमायक्रॉनमुळे संपूर्ण जगाला घोर लागला असताना इंधन दरवाढीतून दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. ओमायक्रॉन सर्वच देशांना निर्बंध वाढवले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकतं.

येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे ५ रुपयांची घट होऊ शकते. नव्या व्हेरिएंटमुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाचे दर घसरले आहेत. १ डिसेंबरपासून जारी होणाऱ्या नव्या दरांमध्येही कपात होण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या दरात घसरण झाल्यानंतर आता भारतातही व्यवसायिक आणि घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होऊ शकते.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगातील सर्वच देश अलर्टवर असून विमान प्रवासावर निर्बंध येऊ शकतात. लॉकडाऊनसारखे निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी माहिती आयआयएफएलचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी दिली. जागतिक बाजारपेठेत याचे पडसाद दिसू लागले आहेत. खनिज तेलाच्या दरात १२ टक्क्यांनी घसरण झाली असून एका बॅरलचा दर ७२ डॉलरवर आला आहे.

ओमायक्रॉनचा कहर वाढल्यास जगभरातील देशांमध्ये असलेले निर्बंध वाढतील. खनिज तेलाच्या मागणीवर याचा परिणाम होईल. २ डिसेंबरला ओपेक देशांची बैठक होत आहे. त्यामध्ये तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो. त्या परिस्थितीत मागणी कमी आणि उत्पादन जास्त अशी अवस्था असेल. त्यामुळे खनिज तेलाचे दर कमी होतील. खनिज तेलाचा दर बॅरलमागे ७२ डॉलर राहिला तरीही पेट्रोल, डिझेल लिटरमागे ५ रुपयांनी स्वस्त होऊ शकतं.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याओमायक्रॉनपेट्रोलडिझेल