ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होणारी घट भारतासाठी दिलासा देणारी ठरली आहे. भारतात पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ९१ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८४ पैसे ऐवढी कपात झाली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहे.
पेट्रोलचे उत्पादन करणा-या देशांच्या संघटनेनेने गुरुवारी पेट्रोलच्या उत्पादनात कपात करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता होती. गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतीने चार वर्षातील नीचांक गाठला होता. गुरुवारी कच्च्या तेलाची किंमत ७६. २८ डॉलर प्रति बॅरेल ऐवढी घसरली होती.
रविवारी भारतात पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात झाल्याने भारताची आर्थिक स्थिती स्थिर होण्यास हातभार लागणार आहे. भारता हा जगातील चौथा सर्वाधिक पेट्रोल वापरणारा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे १४५ बिलीयन डॉलर्स ( ९ हजार अब्ज रुपये) ऐवढ्या कच्च्या तेलाची आयात केली जाते. कच्च्या तेलाची किंमत घटल्याने भारताला सुमारे चार हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.