Join us

ऊस प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू

By admin | Updated: May 12, 2015 00:08 IST

जटील होत जाणाऱ्या ऊस प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले़

नवी दिल्ली : जटील होत जाणाऱ्या ऊस प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले़ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची सोमवार सकाळी भेट घेतली. ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी ८५० रुपये सबसिडी द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करावी आदी मागण्या पवार यांनी केल्या. आमच्या मागण्यांबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. समस्यांवर तोडगा काढू, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शेतीच्या इतर प्रश्नांवरही चर्चा झाली. साखरेचा भाव निश्चित करु न बफर स्टॉक तयार करण्यात यावा, असेही पवारांनी केंद्राला सुचविले. एफआर पी अदा करण्यासाठी आर्थिक साह्य, कर्जाची पुनर्रचना, साखरेस हमी भाव ठरविणे, बफर स्टॉक, कच्ची साखर निर्यात करण्यासाठी सवलत, अबकारी कर्जाबाबत धोरण, इथेनॉलसाठी अनुदान अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली. राज्य साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष कलाप्पा आवाडे, खा. सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी शिष्यमंडळाने वित्तमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. (विशेष प्रतिनिधी)