Join us

‘पेन्शन’निधीची खासगी कंपन्यांच्या समभागांत गुंतवणुकीची शिफारस

By admin | Updated: April 10, 2015 00:25 IST

राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) गुंतवणूक कशी करावी याचे मार्गदर्शन करणासाठी शिफारशी करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने या कोषातील

नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) गुंतवणूक कशी करावी याचे मार्गदर्शन करणासाठी शिफारशी करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने या कोषातील गुंतवणुकीत विविधता आणताना गुंतवणुकीचा काही भाग खासगी इक्विटी किंवा उद्योगात भांडवल गुंतविण्यास सुचविले आहे. पेन्शन निधीचे नियमन करणाऱ्या प्राधिकरणचे (पीएफआरडीए) अध्यक्ष हेमंत कॉन्ट्रक्टर यांनी गुरुवारी उद्योग संघटना असोचेमच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. सध्या राष्ट्रीय पेन्शन योजनेचा निधी फक्त सरकारी रोखे, कॉर्पोरेट बाँड व शेअर्समध्येच गुंतविला जातो.एनपीएसकडे ८२ हजार कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन आहे. यात खासगी क्षेत्रातील एनपीएसधारकांचा वाटा पाच हजार कोटी रुपयांचा आहे. २००४ पासून केंद्र सरकारच्या सेवेत येणाऱ्यांना पेन्शनसाठी एनपीएस लागू करण्यात आली आहे. नंतर ही योजना अनेक राज्यांनीही राबविली. ७८ लाख लोक या योजनेचे सदस्य आहेत. २००९ पासून खासगी क्षेत्रासाठीही ही योजना खुली करण्यात आली आहे.कॉन्ट्रॅक्टर म्हणाले की, ‘जी.एन. वाजपेयी समितीच्या शिफारशींनुसारच या योजनेतील काही पैसा खासगी क्षेत्रात गुंतविण्याचा विचार नियामक प्राधिकरण करीत आहे. थेट गुंतवणुकीच्या या दिवसांत निश्चित लक्ष्य समोर ठेवून नव्या पद्धतीने; पण टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा सल्ला समितीने दिला आहे. ही शिफारस म्हणजे गुंतवणुकीत विविधता आणण्याचाच प्रयत्न आहे.’ कॉन्ट्रक्टर म्हणाले की, ‘सध्या आमची गुंतवणूक ही सरकारी रोखे, कॉर्पोरेट बाँडस् व शेअर्समध्येच आहे. आम्ही अगदी थोडा पैसा त्यात गुंतवू. कारण त्यात जोखीम जास्त आहे.’ वाजपेयी समितीचा अहवाल बुधवारीच सादर झाला असून, तो पुढील किंवा नंतर पीएफआरडीएच्या मंडळासमोर ठेवला जाईल, असे ते म्हणाले.