Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनरांची बँकेतील पायपीट थांबणार

By admin | Updated: May 21, 2014 09:05 IST

सेवानिवृत्ती वेतन वितरणास होणारा उशीर टाळण्यासाठी कामकाज मंत्रालयाने काही ठोस निर्णय घेतले.

नवी दिल्ली : सेवानिवृत्ती वेतन वितरणास होणारा उशीर टाळण्यासाठी कामकाज मंत्रालयाने काही ठोस निर्णय घेतले. यानुसार सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीच्या वेळी पीपीओसह अन्य शिल्लक रक्कम त्वरेने देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. वर्तमानकाळात केंद्र सरकारच्या बिगर लष्करी सेवानिवृत्त धारकांना अधिकृत बँकांच्या माध्यमातून वेतन देण्याची व्यवस्था आहे. सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्‍यांनी संबंधित बँकेला शपथपत्र सादर केल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन सुरू होते. कामकाज मंत्रालयाने सांगितले की, सेवानिवृत्तीनंतर मुख्यत: दोन कारणांमुळे वेतन देण्यास विलंब होतो. पहिले मुख्य कारण म्हणजे, निवृत्तीधारकांकडून बँकेत दस्तावेज जमा केल्याची सूचना देण्यास बराच अवधी लागणे. दुसरे म्हणजे निवृत्तीधारकाकडून बँकेशी संपर्क करण्यास झालेला उशीर, यामुळे पहिले निवृत्तीवेतन देण्यास बराच कालावधी लागतो. निवृत्तीधारकांना पहिले निवृत्ती वेतन सक्रिय करण्यासाठी बँकेत पायपीट करण्याची आवश्यकता नाही. बँकेत आवश्यक दस्तावेज दाखल केल्याची सूचना लेखा कार्यालयाला मिळताच क्षणी पीपीओची प्रत सोपविली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)