Join us  

Paytm : पेटीएम पेमेंट्स बँक बंद झाली, आता पेटीएमच्या कोणत्या सेवा वापरता येतील? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 5:27 PM

Paytm :१५ मार्चपासून कोणत्या सेवा सुरू आहेत आणि कोणत्या सेवा बंद आहेत जाणून घेऊया.

Paytm : काही दिवसापूर्वी आरबीआयने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली. यामुळे आता पेटीएम पेमेंट्स (Paytm) बँकेच्या सर्व सेवा १५ मार्च २०२४ पासून बंद झाल्या आहेत. या कारवाईमुळे अनेक पेटीएम वापरकर्ते संभ्रमात पडले आहेत, पेटीएमच्या अन्य सेवाही चालणार की नाही असा प्रश्न पडला आहे. १५ मार्चपासून कोणत्या सेवा सुरू आहेत आणि कोणत्या सेवा बंद आहेत जाणून घेऊया.

31 मार्चपूर्वी उरकून घ्या 'ही' पाच महत्त्वाची कामे

आरबीआयच्या या निर्णयामुळे आता कंपनीवर मोठी परिणाम झाल्याचे दिसत आहे. कंपनीचे बिझनेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काही कर्मचाऱ्यांना कंपनी लवकरच कमी करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु या सर्व चर्चा निराधार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. शेअर बाजार नियामक सेबीकडे सादर केलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, कंपनीत सध्या वार्षिक मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे.

या सेवा सुरू राहणार

पेटीएम वापरकर्ते पेटीएम ॲप वापरू शकतात. या अॅपवरुन क्रेडिट कार्ड बिल भरू शकतात, मोबाईल रिचार्ज करू शकतात किंवा चित्रपटाची तिकिटे बुक करू शकतात. पेटीएम वापरणारे व्यापारी  QR कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन वापरू शकतात.

पेटीएम ॲपवर उपलब्ध असलेल्या विमा सेवा, कार इन्शुरन्स, आरोग्य विमा, नवीन विमा पॉलिसी देखील सुरू राहतील. वापरकर्ते ॲपवर सहजपणे विमा घेऊ शकतात.

वापरकर्ते पेटीएम मनीद्वारे इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकतात. पेटीएम वापरकर्ते पेटीएम ॲपद्वारे डिजिटल सोने खरेदी आणि विक्री करू शकतात. पेटीएम ॲपद्वारे, वापरकर्ते UPI द्वारे व्यवहार करू शकतात.

या सेवा बंद

पेटीएम वापरकर्ते पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. पेटीएम बँक खात्यात शिल्लक पैसे असल्यास वापरकर्ता त्या शिल्लकद्वारे पैसे देऊ शकतात. पेटीएम पेमेंट्स बँकेत UPI किंवा IMPS द्वारे कोणताही व्यवहार होणार नाही. आता पेटीएम वापरकर्ते त्यांचा पेटीएम फास्टॅग पोर्ट करू शकत नाहीत. आता कोणत्याही यूजरचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेत जमा होणार नाही.

टॅग्स :पे-टीएमभारतीय रिझर्व्ह बँक