नवी दिल्ली : पेटंट हे सॉफ्टवेअर उद्योगासाठी शाप आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी म्हटले आहे. इन्फोसिस ही आठ अब्ज डॉलरची उलाढाल असलेली माहिती-तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. विशाल सिक्का हे कंपनीचे पहिले बिगर-संस्थापक सीईओ आहेत. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सिक्का यांनी सांगितले की, पेटंटमुळे सॉफ्टवेअर उद्योगाचे प्रचंड नुकसान होत आहे. नवप्रतिभा आणि संशोधन यासाठी पेटंट मारक आहेत. अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पेटंटवर नव्याने विचार सुरू केला आहे. गुगलही यावर काम करीत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती-तंत्रज्ञान सेवा कंपनी इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण व विलीनीकरण सौदे करण्यासाठी तयार असल्याचे सिक्का यांनी म्हटले. ते म्हणाले की, आम्ही येथे दुसऱ्याचे अधिग्रहण करण्यासाठी बसलो आहोत. स्वत:चेच अधिग्रहण व्हावे यासाठी नाही. जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत असे होऊ शकणार नाही. आम्ही विलीनीकरण व अधिग्रहणासाठी तयार आहोत. नवोन्मेषी कंपन्यांचे अधिग्रहण करण्यास आमची पसंती आहे. यासाठी जगभरातील कंपन्यांकडे आमचे लक्ष आहे. काही ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या आपण स्वत:ला बळकट करू शकतो. निव्वळ फायदा मिळविण्यासाठी तंत्रज्ञानदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या कंपन्यांचे अधिग्रहण करणार नाही.सिक्का यांनी गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये कंपनीची धुरा हाती घेतली. तेव्हापासून इन्फोसिसने एकही अधिग्रहण केलेले नाही. इन्फोसिस बीपीओने जानेवारी २०१२ मध्ये आॅस्ट्रेलियातील पोर्टलँड ग्रुपचे ४.१ कोटी डॉलरमध्ये अधिग्रहण केले होते. यंदा कंपनी झुरिच येथे मुख्यालय असलेल्या लोडस्टोन होल्डिंगचे अधिग्रहण करणार आहे.
पेटंट हे सॉफ्टवेअर उद्योगासाठी कलंक
By admin | Updated: January 17, 2015 01:09 IST