नवी दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या पतंजली आयुर्वेदने सोमवारी पौष्टिक इन्स्टंट नूडल्स बाजारात आणले. हे नूडल्स नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सशी स्पर्धा करतील असा त्यांचा दावा आहे. पाच महिन्यांपूर्वी बंदी असल्यामुळे बाजारातून काढून घेतलेले नेस्लेची मॅगी नूडल्स बंदी उठल्यामुळे पुन्हा उपलब्ध झाले आहेत.आपल्या नूडल्सची मागणी पूर्ण करण्यासाठी पतंजली वर्षभरात पाच नवे उत्पादन केंद्र सुरू करणार आहे. ती दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात असतील. या केंद्रांवर पतंजलीची अन्य उत्पादनेही तयार होतील. बाबा रामदेव यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, येत्या डिसेंबरअखेर आमचे नूडल्स १० लाख दुकानांमध्ये उपलब्ध असतील. आम्ही आमची उत्पादन क्षमता वाढवीत आहोत. या नव्या केंद्रांसाठी किती गुंतवणूक होणार आहे याचा तपशील त्यांनी दिला नाही. पतंजलीने ७० गॅ्रमच्या नूडल्सची किंमत १५ रुपये ठेवली आहे. स्पर्धकांपेक्षा हे नूडल्स १० रुपयांनी स्वस्त असल्याचा त्यांचा दावा आहे. या नूडल्समध्ये राईस ब्रॅन तेल किंवा पामतेल वापरण्यात आलेले नाही. इतर कंपन्या मात्र हे तेल वापरतात. पतंजलीची ही उत्पादने रिलायन्स फ्रेश, बिग बाजार, डी मार्ट आणि पतंजलीच्या दुकानांवर किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पतंजली यावर्षीच्या अखेर तान्ह्या बाळांसाठी तेल व पौष्टिक आहारही बाजारात आणणार आहे, असे बाबा रामदेव म्हणाले. पतंजली कंपनी वेशभूषा उद्योगातही प्रवेश करणार आहे.व्यवसाय ५ हजार कोटींवर नेणारपतंजली कंपनीने सौंदर्य प्रसाधने, तेल, आरोग्यदायी आहार आणायचे जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये पतंजलीने २,००७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला व यावर्षी तो पाच हजार कोटी रुपयांचा होईल अशी आशा असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.
पतंजलीचे नूडल्स बाजारात
By admin | Updated: November 17, 2015 03:01 IST