Join us

पान २ खरेदीची क्रेझ उतरेना

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST

खरेदीची क्रेझ उतरेना

खरेदीची क्रेझ उतरेना
पणजी : यंदा दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे सण लागोपाठ आल्याने दिवाळीची खरेदी संपुष्टात येतानाच भाऊबीजेच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले पुन्हा बाजारपेठांकडे वळू लागली आहेत. दरम्यान, सु˜ीमुळे शहरात राहणारे गोमंतकीय नागरिक आपापल्या गावी परतले असता शहरात देशी पर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात जाणवत होती.
गोमंतकीयांत पाडवा सण साजरा करण्याचे प्रमाण बर्‍यापैकी कमी झाले असल्याचे दिसते. पाडव्या दिवशी गोधनाची पूजा करून त्यांना गोडधोड पदार्थ खाऊ घातला जातो. राज्यातील ग्रामीण भाग वगळता पाडवा साजरा करण्याची परंपरा कमी होत चालली असल्याचे जाणवते.
पाडव्यादिनी गोधनाला आंघोळ घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा व त्यांना गोडपोळा दिला जातो. गायी व बैलांकडून या दिवशी कोणतेही काम करून घेतले जात नाही. तसेच काही देवळात श्रीकृष्ण पूजनाची परंपरा आहे. या दिवशी कृष्णाची पूजा, भजने केली जातात. गोव्यात स्थायिक झालेल्या बाहेरगावच्या लोकांमध्ये व खास करून महाराष्ट्रातील लोक पाडव्यादिनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना म्हणजे नवरा, मुलगा, दीर, सासरा यांची ओवाळणी करतात. नवविवाहित जोडप्यांमध्ये हा पाडवा सण विशेष आनंदाचा असतो. पहिला दिवाळसण म्हणून याच दिवशी नव दाम्पत्यांना मानाच्या वस्तू, सोने इत्यादी दिले जाते.
दरम्यान, बाजारात भाऊबीजेच्या खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. काही वर्षांपूर्वी भाऊबीज भेट म्हणून स्टीलची भांडी खरेदी केली जायची. आता ही क्रेझ बदलत असून सध्या विविध तर्‍हेच्या क्रॉकरी, कपडे, सजावटीच्या वस्तू व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी आग्रह धरला जातो. सायंकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी असल्याने शहरात पार्किंगची समस्या उद्भवली. मार्केट परिसरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. भाऊबीज विकेण्डला आल्याने खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसत होती.