Join us

पान १/ पर्रीकर यांना संरक्षणमंत्रीपद?

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST

पर्रीकर यांना संरक्षणमंत्रिपद?

पर्रीकर यांना संरक्षणमंत्रिपद?
मोदींचा आग्रह: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू
हरीष गुप्ता/नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राष्ट्रीय राजकारणात आणून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते देण्याचा विचार सुरू असल्याचे भाजपामधील वरिष्ठ सूत्रांकडून समजते. पर्रीकर यांना संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपविली जाईल जेणेकरून ते सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीचे सदस्य या नात्याने पंतप्रधान मोदी यांच्या थेट संपर्कात राहतील, असेही सांगितले जाते.
पक्षाच्या सूत्रांनुसार केंद्रात सत्तेत येऊन पाच महिने पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी मंत्रिमंडळात((( खांदेपालट))) व विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू केली असून या संभाव्य बदलांना पद्धतशीरपणे अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.
पर्रीकर यांना गोव्याहून दिल्लीत आणणे हा याचाच एक भाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनुसार खरे तर पर्रीकर यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्यास मोदी आधीपासूनच उत्सुक होते; परंतु पर्रीकरांनंतर गोवा कोणाकडे सोपवायचे याचे उत्तर शोधण्यामुळे त्यांना आतापर्यंत थांबावे लागले होते. मात्र, आता भाजपाने पर्रीकरांच्या जागी मुख्यमंत्री करण्यासाठी पर्याय शोधला असल्याने पर्रीकर राज्यातून मोकळे होऊ शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. निर्विवाद सचोटी आणि निर्भेळ प्रामाणिकपणा या निकषांवर शंभर टक्के उतरणारी व्यक्ती संरक्षणमंत्री पदावर असा पंतप्रधानांचा आग्रह असून त्यामुळेच पर्रीकरांची निवड केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
आयआयटी मुंबईत शिक्षण झालेले पर्रीकर यांचे व्यक्तिमत्त्व सडेतोड असून रा. स्व. संघाचा पूर्ण पाठिंबाही त्यांची आणखी एक जमेची बाजू आहे. २६ मे रोजी मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून वित्तमंत्री अरुण जेटली संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. कंपनी व्यवहार खात्याची जबाबदारीही तेच सांभाळत आहेत. या अतिरिक्त जबाबदार्‍यांमधून आपल्याला लवकरात लवकर मोकळे करावे, अशी विनंती जेटली यांनी पंतप्रधानांना याआधीही अनेक वेळा केलेली आहे.
सूत्रांनुसार श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील पर्यटन मंत्रालयाच्या कामगिरीवर मोदी फारसे समाधानी नसल्याने या खात्यासही नवा मंत्री मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय इतर काही मंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार असलेल्या खात्यांना पूर्णवेळ मंत्री देण्यासाठी मोदी भाजपाच्या दोन किंवा त्याहून अधिक नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे बाजूला राहिलेल्या उत्तर भारतातील पक्षनेत्यांची यामध्ये वर्णी लागू शकते. डिसेंबरमध्ये झारखंडची आणि मेमध्ये बिहारची विधानसभा निवडणूक होत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार करताना त्या राज्यांकडेही लक्ष द्यावे लागेल. त्यादृष्टीने लोकसभा सदस्य असलेले माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव ((((जयवंत))) सिन्हा यांचा विचार केला जाऊ शकतो, असे सूत्रांना वाटते. निर्मला सितारामन यांच्याकडेही व्यापार मंत्रालयाचा स्वतंत्र व वित्त मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून दुहेरी कार्यभार आहे. त्या व्यापार मंत्रालय कायम ठेवतील व वित विभागाची जबाबदारी सोडतील, असे समजते. या राज्यमंत्रिपदासाठीही नवा चेहरा आणला जाण्याची शक्यता आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील भरघोस यशानंतर या राज्यांमधूनही किमान दोन नवे मंत्री घेतले जावेत, असा विचार पक्षात सुरू असल्याचे कळते. एरवीही गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूनंतर रिकामे असलेले महाराष्ट्राच्या वाट्याचे मंत्रिपद अद्याप भरायचे शिल्लक आहेच. नितीन गडकरी ग्रामीण विकास खात्याचा कार्यभार सोडतील व त्या खात्याच्या मंत्रिपदासाठी बिहारमधील एका ज्येष्ठ संसद सदस्याची निवड केली जाईल, असेही संकेत आहेत.
-----------------चौकट---------
गोयल, जावडेकर यांना बढती?
कोळसा, वीज आणि अक्षय ऊर्जा या खात्यांचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री पियुष गोयल व माहिती आणि नभोवाणी, पर्यावरण आणि वने या खात्यांचा स्वतंत्र व संसदीय कामकाज खात्याची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे प्रकाश जावडेकर यांच्या कामगिरीवर मोदी समाधानी असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात या दोघांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याचेे संकेत आहेत. मुस्लिम समाजासही आणखी प्रतिनिधित्व द्यावे व एखादा शिख मंत्रीही करावा, याबाबत भाजपा आग्रही असल्याचेही कळते. शिवाय पहिल्यांदाच निवडून आलेल्या काही तरुण महिला संसद सदस्यांचाही मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. मात्र, अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे.