Join us

वीज ग्राहकांचा उद्रेक; वितरण कार्यालयांवर हल्ला

By admin | Updated: October 1, 2014 00:06 IST


नंदुरबार : दोन दिवसांपासून सातत्याने होणार्‍या भारनियमनामुळे वीज ग्राहकांच्या भावनांचा उद्रेक झाला. तीन वेगवेगळ्या घटनांत संतप्त ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या तीन कार्यालयांवर हल्ले केले. तर हल्ल्यांच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले.
वीजपुरवठा नियमित करण्याच्या मागणीसाठी भोणे येथील शेतकरी वीज कंपनीच्या बसस्थानकासमोरील कार्यालयात गेले. मात्र कर्मचार्‍यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. तसेच सहायक अभियंत्याला मारहाण केली.
दुसर्‍या घटनेत शहरातील नेहरूनगर वीज केंद्रात दूरध्वनी संच तसेच इतर वस्तूंची दोन जणांनी तोडफोड केली. खामगाव येथे गरबा सुरू आहे. त्यासाठी भारनियमन करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी केंद्रातील महिला उपकार्यकारी अभियंता के. टी. परदेशी यांना फोनवरून शिवीगाळ केली.
तिसर्‍या घटनेत आष्टे वीज उपकेंद्रात दोन जणांनी ऑपरेटर डी. पी. पाटील यांना मारहाण केली. यानंतर संबंधित कार्यालयातील कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. (प्रतिनिधी)