Join us

मुदत ठेवीची रक्कम ठेवीदारास सव्याज परत करण्याचा आदेश

By admin | Updated: November 4, 2014 02:24 IST

ठेवीदाराने ठेवलेल्या मुदत ठेवीची मुदत संपल्यावर ठेवीची रक्कम त्या ग्राहकास परत न करता भलत्याच कोणाला तरी परत करणा-या स्टेट बँक आॅफ इंडियाने ती रक्कम संबंधित ठेवीदारास व्याजासह परत करावी

मुंबई : ठेवीदाराने ठेवलेल्या मुदत ठेवीची मुदत संपल्यावर ठेवीची रक्कम त्या ग्राहकास परत न करता भलत्याच कोणाला तरी परत करणा-या स्टेट बँक आॅफ इंडियाने ती रक्कम संबंधित ठेवीदारास व्याजासह परत करावी, असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलाआहे.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या औरंगाबाद येथील अस्थायी खंडपीठाने दिलेल्या निकालाविरुद्ध स्टेट बँकेने केलेले अपील फेटाळताना राष्ट्रीय आयोगाचे पीठासीन अध्यक्ष न्या. व्ही. के. जैन व सदस्य डॉ. बी. सी. गुप्ता यांनी हा आदेश दिला.अहमदनगर येथील नागापूर औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र सॉ मिल चालविणारे प्रकाश धोंडीराम भोसले यांच्या संदर्भात हा आदेश दिला गेला आहे. त्यानुसार स्टेट बँकेच्या अहमदनगरमधील मुख्य शाखेने भोसले यांनी मुदत ठेवीत ठेवलेली चार लाख रुपयांची रक्कम नोव्हेंबर २००७ पासूनच्या व्याजासह त्यांना परत करायची आहे. याशिवाय बँकेने भोसले यांना भरपाईपोटी तीन हजार रुपये व दाव्याचा खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावेत, असाही आदेश दिला गेला.भोसले यांनी २४ फेब्रुवारी २००७ ते २५ मे २००७ अशा तीन महिन्यांच्या मुदतीसाठी चार लाख रुपये स्वत:च्या व्यक्तिगत नावावर मुदत ठेवीत ठेवले होते. मुदत संपल्यावर भोसले यांनी मुदत ठेवीच्या मूळ पावतीच्या मागे सस्वाक्षरी करून आणखी सहा महिन्यांसाठी ठेव ठेवण्यासाठी बँकेकडे दिली. ही सहा महिन्यांची मुदत संपल्यावर भोसले ठेवीची रक्कम व्याजासह घेण्यासाठी गेले तेव्हा बँकेने त्यांना रक्कम देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)