Join us  

१२०६८ घरं, २३०१ दुकानं स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी; PNB ची लोकांना ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 8:38 AM

पंजाब नॅशनल बँकेने ई-ऑक्शनची तारीख आणि त्यात किती संपत्तीचा लिलाव होणार हे सांगितले आहे

नवी दिल्ली – जर तुम्ही नवीन दुकान किंवा घर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर घेऊन आले आहे. देशभरात लोक पंजाब नॅशनल बँकेच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. पंजाब नॅशनल बँकेने ई-ऑक्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात निवासी घरे, व्यावसायिक मालमत्ता, इंडस्ट्रियल मालमत्ता, कृषी जमीन आणि सरकारी मालमत्तांचाही समावेश आहे. कुणीही व्यक्ती या ई ऑक्शनमध्ये भाग घेऊन मालमत्ता स्वस्त दरात खरेदी करू शकता.

केव्हा होणार ई-ऑक्शन?

पंजाब नॅशनल बँकेने ई-ऑक्शनची तारीख आणि त्यात किती संपत्तीचा लिलाव होणार हे सांगितले आहे. PNB ने म्हटलंय की, देशभरातील निवासी, व्यावसायिक मालमत्तेसाठी ऑनलाईन मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकता. ३ ऑगस्ट २०२३ ला हा कार्यक्रम होणार आहे. त्याशिवाय २२ ऑगस्ट २०२३ रोजीही मेगा ई-ऑक्शन आयोजित केले जाणार आहे. पंजाब नॅशनल बँकेनं बुडीत कर्जधारकांकडून रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्याकडून गहाण असलेल्या मालमत्तेचा लिलाव करत आहे.

किती प्रॉपर्टीचा होणार लिलाव?

पंजाब नॅशनल बँकेच्या वेबसाईटनुसार, १२ हजार ६८ निवासी घरे, २३०१ व्यावसायिक दुकाने, १२०० इंडस्ट्रियल, १११ कृषी जमीन, ३४ सरकारी आणि ११ पार्टिसिपेटिंग प्रॉपर्टीजचा लिलाव केला जाईल. त्याशिवाय पुढील ३० दिवसांत २७९९ निवासी घरे, ७४४ व्यावसायिक, २४९ इंडस्ट्रियल प्रॉपर्टीचाही लिलाव होणार आहे. या मालमत्ता डिफॉल्ट यादीत आहेत.

बँका मालमत्तेचा लिलाव का करतात?

लोकांना कर्ज देताना बँक त्यांची निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी हमी म्हणून गहाण ठेवते. कर्ज घेणारी व्यक्ती पैसे फेडण्यास असमर्थ असल्यास, बँक त्याची मालमत्ता विकून त्याचे पैसे वसूल करते. बँकेच्या संबंधित शाखा वृत्तपत्रांमधून लिलावाबाबत जाहिराती प्रसिद्ध करतात, ज्यामध्ये लिलावाशी संबंधित माहिती दिली जाते.

मी लिलावात कसा भाग घेऊ शकतो?

जर तुम्हाला PNB द्वारे आयोजित केलेल्या ई-लिलावात सहभागी व्हायचे असेल तर नोटीसमध्ये नमूद केलेल्या मालमत्तेसाठी काही रक्कम (EMD) जमा करावी लागेल. याशिवाय केवायसी कागदपत्रे संबंधित शाखेत दाखवावी लागतात. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी आवश्यक आहे. ईएमडी जमा केल्यानंतर आणि संबंधित बँकेच्या शाखेत केवायसी कागदपत्रे दाखवल्यानंतर, लिलावात बोलीदाराच्या ईमेल आयडीवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठविला जातो. अशा प्रकारे ई-लिलावात सहभागी होता येईल.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक