Join us  

गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढतेय! केवळ 831 लोकांकडे देशाचा 25 टक्के जीडीपी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 9:09 AM

फक्त 831 व्यक्तींकडे 1 हजार कोटी रुपयांची संपत्ती

नवी दिल्ली: गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत असल्याचं बार्कलेज हुरुन रिच लिस्टवरुन समोर आलं आहे. घसरता रुपया, खनिज तेलाचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असली, तरी देशातील संपत्ती निर्मितीचा वेग नव्या उंचीवर पोहोचला आहे. देशातील केवळ 831 लोकांकडे असणाऱ्या संपत्तीचं मूल्य 1 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. याचाच अर्थ देशाचा एक चतुर्थांश जीडीपी फक्त 831 लोकांकडे आहे. भारतातील 831 लोकांकडे असलेल्या संपत्तीचं मूल्य 719 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं आहे. भारताचा जीडीपी 2 हजार 848 कोटी आहे. त्यामुळे टक्केवारी विचारात घेतल्यास, देशातील केवळ 831 लोकांकडे देशाचा 25 टक्के जीडीपी असल्याचं बार्कलेज हुरुनचा अहवाल सांगतो. बार्कलेज हुरुननं देशातील श्रीमंतांची यादीदेखील तयार केली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 214 नव्या नावांचा समावेश झाला आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या यादीत सलग सातव्या वर्षी पहिलं स्थान मिळवलं आहे. बार्कलेज हुरुननं प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीत काही नव्या नावांचा समावेश झाला आहे. यामध्ये ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचा समावेश आहे. 24 वर्षांच्या रितेश अग्रवाल यांच्या ओयो कंपनीचं बाजारमूल्य 5 बिलीयन अमेरिकन डॉलर इतकं आहे. या यादीत समावेश झालेले ते भारताचे सर्वात तरुण उद्योगपती आहेत. भारतातील 831 व्यक्तींचा समावेश बार्कलेज हुरुनच्या यादीत आहे. विशेष म्हणजे यातील 113 व्यक्ती या पहिल्या पिढीतील उद्योगपती आहेत. या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा समावेश आधी बार्कलेज हुरुनच्या यादीत झालेला नाही. यातील बहुतांश उद्योगपती हे तरुण असून त्यांनी डिजिटल अर्थव्यवस्था क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.  

टॅग्स :मुकेश अंबानीव्यवसाय