Join us  

पुढील तिमाहीसाठी फक्त १३ टक्के कंपन्यांतच भरती, या क्षेत्रात रोजगारनिर्मिती शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 6:12 AM

सर्वेक्षणातील माहिती; सुदैवाने कपात नाही

नवी दिल्ली : भारतीय रोजगार बाजार मोठ्या स्थित्यंतराचा सामना करीत असून, जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी देशातील केवळ १३ टक्के कंपन्यांनीच नोकर भरती करण्याच्या योजना तयार केल्या आहेत. ६१ टक्के कंपन्या आपल्या कर्मचारी संख्येत कोणताही बदल करू इच्छित नाहीत.

‘मॅनपॉवर ग्रुप’ने केलेल्या रोजगार अंदाज सर्वेक्षणात ही माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, देशातील १३ टक्के कंपन्या कर्मचारी संख्या वाढविण्याचा विचार करीत आहेत. कर्मचारी कपातीची योजना मात्र कोणाचीही नाही. ६१ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थितीत राहतील. २६ टक्के कंपन्या याबाबत संभ्रमित आहेत. यातून शुद्ध रोजगार वृद्धी अंदाज १३ टक्के इतका मिळतो. २0१८ च्या याच काळाच्या तुलनेत नोकरभरतीत ४ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

मॅनपॉवर ग्रुप इंडियातील सहसंचालक (विपणन) सिंथिया गोखले म्हणाले की, या सर्वेक्षणानुसार भारतातील रोजगार बाजार सातत्य राखून असल्याचे दिसते. रोजगारात किंचित घसरण दिसून येत आहे. रोजगार बाजार स्थित्यंतराच्या स्थितीतून जात आहे.या क्षेत्रात रोजगारनिर्मिती शक्यसिंथिया गोखले यांनी सांगितले की, क्षेत्रनिहाय विचार करता सेवा क्षेत्रात सर्वाधिक १६ टक्के शुद्ध रोजगारनिर्मितीचा अंदाज समोर येत आहे. त्याखालोखाल खाण आणि बांधकाम, घाऊक आणि किरकोळ व्यापार, तसेच वस्तू उत्पादन या क्षेत्रात ११ टक्के रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. २0१९ मधील नोकरभरतीत वैविध्य, आॅटोमेटेड भरती, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि रिमोट वर्किंग यासारखे प्रमुख कल समोर येत आहेत. एचआर क्षेत्रात सुधारणा होताना दिसत आहे.

टॅग्स :नोकरीदिल्ली