Join us

साठेबाजीमुळे कांदा आणखी भडकण्याची चिन्हे ?

By admin | Updated: August 15, 2015 01:29 IST

अपेक्षित उत्पादनाअभावी देशभरात दररोज वाढणारे कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी नाफेडने १० हजार टन कांद्याच्या आयातीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काढलेल्या

नवी दिल्ली : अपेक्षित उत्पादनाअभावी देशभरात दररोज वाढणारे कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी नाफेडने १० हजार टन कांद्याच्या आयातीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काढलेल्या निविदेला एकाही देशाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ‘नाफेड’ पुन्हा निविदा काढणार आहे; मात्र दुसऱ्याही निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास साठेबाजीला ऊत येऊन कांद्याचे भाव आणखी भडकू शकतात.‘नाफेड’ने (नॅशनल अग्रीकल्चर को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आॅफ इंडिया) १० हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी २४ जुलैला निविदा काढली होती. ७ आॅगस्टला त्याची मुदत संपली; मात्र या मुदतीत पाकिस्तान, इजिप्त आणि चीनकडून निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे आता नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. ५०० टनांचे स्वतंत्र टप्पे करून पुन्हा निविदा काढल्यास त्याला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना आहे.पाकिस्तानमधून कांद्याची आयात करणे सोपे असल्याने तेथून कांदा आणण्यास आमचे प्राधान्य आहे, असे ‘नाफेड’चे उपाध्यक्ष विजेंद्र सिंह यांनी सांगितले.महिनाभरात किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात गेल्या वर्षापेक्षा तब्बल १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या दर स्थिरीकरण निधीअंतर्गत खरेदी केलेला सुमारे १० हजार टन कांदा हळूहळू बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या बाजारात दररोज सुमारे २५० टन कांदा ‘नाफेड’मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. साठेबाजीची भीतीपहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने व्यापारी कांद्याची साठेबाजी करण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर अधिक भडकू शकतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन होते; मात्र या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने अपेक्षित प्रमाणात खरिपाची लागवड झालेली नाही. परिणामी सप्टेंबरमध्ये नवा कांदा बाजारात आल्यानंतरही त्याचे दर नियंत्रित ठेवण्याचे सरकारपुढे आव्हान असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)