Join us  

तेल खरेदी इराण की अमेरिकेकडून?, मोदी सरकारसमोर कठीण पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:57 AM

अमेरिकेनं इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आपला परंपरागत तेल पुरवठादार देश इराणकडून स्वस्तातले कच्चे तेल घ्यायचे की अमेरिकेकडून, असा अतिशय गंभीर पेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर उभा राहिला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेनं इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आपला परंपरागत तेल पुरवठादार देश इराणकडून स्वस्तातले कच्चे तेल घ्यायचे की अमेरिकेकडून, असा अतिशय गंभीर पेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर उभा राहिला आहे. कुठलाही निर्णय घेतला, तरी काही फायदे-तोटे भारताला सहन करावे लागणार आहेत.सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेने निर्बंध लादल्याने अडचणीत आलेल्या इराणने भारताला तेलखरेदीवर काही सवलती देऊ केल्या आहेत. शिवाय इराणी तेल भारताला स्वस्तात मिळत आहे. इराण हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा तेल पुरवठादार देश आहे. मार्चला संपलेल्या वर्षात इराणकडून भारताने ९ अब्ज डॉलरचे तेल खरेदी केले होते. इराणकडून पूर्वीप्रमाणेच खरेदी करीत राहिल्यास भारताची विदेशी चलनात मोठी बचत होणार आहे, शिवाय मोठ्या काळासाठी उधारीची सवलतही मिळणार आहे. इराणकडून तेलखरेदी थांबविल्यास यास मुकावे लागेल.अमेरिकेचे तेल इराणच्या तुलनेत महाग आहे, तरी अमेरिकेकडून तेलखरेदीत भारताचे काही फायदे आहेत. सध्या अमेरिकेने चीनसोबत व्यापारयुद्ध छेडले आहे. चीन भारताचाही पारंपरिक शत्रू आहे. इराणी तेलाची आयात बंदी करून भारत अमेरिकेची मैत्री संपादन करू शकतो. भारताने अमेरिकी तेलाची आयात वाढविल्याचे सेन्सस ब्युरो अँड एनर्जी इन्फॉर्मेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या आकडेवारीवरून दिसते. भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार २४.५ अब्ज डॉलरने शिलकी आहे. अमेरिकी कच्चे तेल आयात करून भारत ही दरी कमी करू शकेल. त्या बदल्यात आपल्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर लादलेले शुल्क भारताला कमी करून घेता येईल.>भारतासाठी ही ठरणार सुवर्णसंधीलंडन येथील इंटरफॅक्स एनर्जी या संस्थेचे विश्लेषक अभिषेक कुमार यांनी सांगितले की, इराणवरील निर्बंधांमुळे अमेरिकेचे अधिकाधिक तेल भारतात आणण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. अमेरिका-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बाब सकारात्मक ठरेल.

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्प