Join us  

तेल घ्या आणि वर पैसेही घ्या; खनिज तेलाची वजा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 3:11 AM

एक ऐतिहासिक, अनपेक्षित परंतु तात्पुरती घटना

- प्रा. शेखर सोनाळकर

पश्चिम टेक्सास बाजारात अमेरिकेच्या शेल ऑइलच्या मे वायद्याची किंमत ३०० टक्क्यांनी पडली आणि प्रतिबॅरल १७.८५ डॉलरवरून ती वजा ३७.६३ डॉलर झाली. याचा अर्थ एक बॅरल खनिज (एक बॅरल म्हणजे १५९ लिटर) तेल विकत घेणाऱ्यास विकणारा बॅरलमागे ३७.६३ डॉलर देईल. खनिज तेल विकत घेण्याचा करार करा आणि वर पैसेही घ्या, अशी स्थिती अमेरिकेमध्ये होती.खनिज तेलाची विक्री वायदा (फ्यूचर) पद्धतीने होते. मे महिन्यात जे तेल ताब्यात घ्यायचे होते, ते ताब्यात घेऊन वाहतूक करून नेणे यासाठी वाहतूक खर्च येतो. साठवण करून ठेवण्यासाठी खर्च येतो, तो करण्याची वायदा घेणाऱ्यांची तयारी नव्हती. आधीच भरपूर उत्पादन करून तेल कंपन्यांनी जमिनीवर व समुद्रात जहाजांवर साठा करून ठेवल्याने साठवण करण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही.जगात आशियातील तेल उत्पादक अरब देशाचे नेतृत्व ओपेक संघटना करते. अलीकडे रशिया मोठे उत्पादन करीत आहे. याशिवाय सर्वात मोठे तेलसाठे व्हेनेझुएलात आहेत. रशिया आणि ओपेक यांच्यात स्पर्धा असतानाच अमेरिकाही सक्रिय आहे.या वजा किमती केवळ अमेरिकेच्या पश्चिम टेक्सास बाजारात होत्या. त्याही केवळ मे महिन्याच्या वायद्याबाबत. पश्चिम टेक्सास बाजारात जून महिन्याची वायदा किंमत २० डॉलर आहे. जगात इतरत्र अशी स्थिती नाही. हे असे पहिल्यांदाच होत आहे.सोमवारी झालेली घटना ही सट्टाबाजारातील घटना आहे. सट्टाधारक मालाची विक्री करू शकत नव्हता. त्याला ताबाही घ्यायचा नव्हता. यामुळे तो काहीही करून विक्री करू इच्छित होता. परिणामी दर शून्याखाली गेले. जगात कोरोनाच्या उद्रेकामुळे वाहतूक थांबली आहे. खनिज तेलाची मागणी मंदावली आहे. उत्पादक कंपन्या किमती कमी झाल्याने नुकसानीत आहेत. त्यांना उत्पादन बंद करायची वेळ आली आहे. उत्पादन बंद करून तेल विहिरींना आराम दिल्यास पुन्हा उत्पादन सुरु करण्यासाठी बराच वेळ आणि खर्च येतो. यामुळे उत्पादन सुरु ठेवावे लागते. उत्पादन कमी करून मागणीपेक्षा उत्पादन जास्त असणार आहे. यामुळे भविष्यात किमती कमी राहू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७.५ कोटी बॅरल विकत घेण्याचे धोरण जाहीर केले आहे.अमेरिकेतील उत्पादन खर्च जास्तअमेरिका पूर्वी आपले तेलसाठे राखीव ठेवून अरब देशात तेल उत्पादन करताना अमेरिकन कंपन्या मोबदला तेलरुपात घेत. ते स्वस्त तेल अमेरिका आपल्या नागरिकांना देत असे. अलीकडे अमेरिकेने क्रूड आॅइल उत्पादन सुरु केले आहे. क्रूड आॅइलचे उत्पादन एका बॅरलमागे ३ ते ५ डॉलर तर कॅनडा-अमेरिकेतील शेल आॅइलचा उत्पादनखर्च ४० ते ५० डॉलर बॅरल आहे.भारतात किमती कमी होणार ?भारत व्यापार समता किंमतच्या आधारे क्रूड आॅइलची खरेदी करतो. भारतातील किंमत ८० टक्के आयात किंमत व २० टक्के निर्यात किंमत आणि काही देशांच्या खनिज तेलाच्या किमतीच्या सरासरीने ठरते. ब्रेंट किंमत ही एक कमी घनता व कमी सल्फर असलेली उत्तर समुद्रातील तेलाची किंमत व पश्चिम टेक्सास बाजारातील किंमत यांच्या किमतीची सरासरी आहे. त्यामुळे भारतात काही प्रमाणात किमती उतरतील.(लेखक जळगाव येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकौन्टंट आहेत.)

टॅग्स :खनिज तेलकोरोना वायरस बातम्या