पुणे : आॅक्टोबर हिटमुळे राज्यातील विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत दोनदा १७ हजार, तर दोनदा १६ हजार मेगावॅटवर विजेची मागणी पोचली होती. तसेच मागणी व पुरवठ्यातील तफावत, तांत्रिक कारण, विजेची अनुपलब्धता यामुळे भारनियमानेदेखील ९७३ मेगावॅटची मजल गाठली. उकाड्यात वाढ झाल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. महावितरणने ५ आॅक्टोबरला ३६४.५७ दशलक्ष युनिटस् विजेचा पुरवठा करून आठ दिवसांपूर्वी केलेला वीज पुरवठ्याचा विक्रम मोडीत काढला आहे. दसऱ्याचा (दि. ३) अपवाद वगळता राज्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. राज्यात ५ आॅक्टोबर रोजी १७ हजार १२३ मेगावॅट विजेची मागणी होती. त्या पैकी १६ हजार ७०५ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला होता, तर ४१८ मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले आहे, तर चार आॅक्टोबर रोजी १७ हजार ६९४ मेगावॅटची मागणी होती. त्या पैकी १६ हजार ७२१ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला, तर ९७३ मेगावॅटचे भारनियमन करण्यात आले. दसऱ्याला केवळ १५ हजार १५९ मेगावॅट विजेची मागणी होती. त्या दिवशी विजेचा पुरवठा १५ हजार १८ व भारनियमन १४१ मेगावॅट करण्यात आली. (प्रतिनिधी)
आॅक्टोबर हिटमुळे भारनियमन वाढले
By admin | Updated: October 7, 2014 02:39 IST