Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोटांसाठी एनआरआयही रांगेत

By admin | Updated: February 22, 2017 00:45 IST

नोटाबंदीनंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्याचा दावा भलेही सरकार करीत असेल; पण दिल्लीत रिझर्व्ह बँकेसमोरचे

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली नोटाबंदीनंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्याचा दावा भलेही सरकार करीत असेल; पण दिल्लीत रिझर्व्ह बँकेसमोरचे दृश्य पाहून यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. नोटाबंदीच्या साडेतीन महिन्यांनंतरही येथे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आजही शेकडो लोक रांगेत उभे असल्याचे चित्र आहे. कॅनडातून आलेले सुधीर श्रीवास्तव सांगतात की, एक महिन्यापूर्वी आईचे निधन झाले. तिच्याकडे ६० हजार रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. अंतिम संस्कारानंतरच्या विधीसाठी ते भारतात आलेले आहेत. या नोटा बदलून मिळतील अशी आशा त्यांना होती; पण तसे झाले नाही. भारतीय पासपोर्ट जमा करून टाकल्यामुळे आता आपल्याला नोटा बदलून मिळत नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या ओवरसीज सिटीजन कार्डबाबत सांगितले; पण तरीही काम झाले नाही. आपल्या कुटुंबासह दक्षिण आफ्रि केत असलेल्या सुरजित यांनी सांगितले की, पत्नीसह आपण दोन दिवसांपासून बँकेत चकरा मारत आहोत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य नेहमीच भारतात येत असतात. त्यांच्याकडे १.१३ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आहेत; पण त्यांना असे सांगण्यात आले आहे की, केवळ २५ हजारांच्याच नोटा बदलून मिळतील. त्यांनी असेही सांगितले की, दक्षिण आफ्रि केसह अनेक देशांत आपल्या ओळखीच्या नागरिकांकडे १० ते ५० हजार रुपयांच्या नोटा आहेत; पण भारतात येऊ शकत नसल्यामुळे ते या नोटा बदलू शकत नाहीत. नोटा बदलण्यासाठी आपल्या भावाची वाट पाहत असलेल्या अमित सरकार यांनी सांगितले की, मोदी यांनी स्पष्ट केले होते की, ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा जमा करता येतील; पण रिझर्व्ह बँक पैसे देण्यासाठी तयार नाही. आपल्याकडील ३८ हजार रुपयांच्या नोटांचा पूर्ण हिशेब देण्याची त्यांची तयारी आहे; पण बँक केवळ २५ हजार रुपयेच देण्यास तयार आहे. दरम्यान, एका विवाह समारंभासाठी भारतात आलेल्या निपुण यांनी सांगितले की, १९ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आपण चंदीगडमध्ये रिझर्व्ह बँकेत गेलो होतो; पण बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला. त्यामुळे आपल्याला दिल्लीला यावे लागले. बड्या शहरांत सुविधारिझर्व्ह बँकेने दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि नागपूर येथील शाखांत अनिवासी भारतीयांसाठी २५ हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा बदलून देण्याची सुविधा दिली आहे.'पण नागरिकांचे असे म्हणणे आहे की, नोटाबंदीची घोषणा करताना ही मर्यादा सांगण्यात आली नव्हती. सोमवारीही या बँकेसमोर शंभरहून अधिक नागरिकांची रांग होती.