नवी दिल्ली : तुमच्या बेकायदेशीर ठेवींची माहिती आमच्याकडे आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत (पीएमजीकेवाय) हा पैसा उघड करून स्वच्छ व्हा, अन्यथा तुमची उलटी गणती आता सुरू झाली आहे, हे गृहीत धरा, असा गंभीर इशारा आयकर विभागाने काळा पैसा बाळगणाऱ्यांना दिला आहे.प्राप्तीकर विभागाने आघाडीच्या राष्ट्रीय दैनिकांत एक जाहिरात प्रसिद्ध करून हा इशारा दिला आहे. काळा पैसा जाहीर करा, अन्यथा नंतर पश्चात्ताप करावा लागेल, असे या जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्याआधी तुमच्याकडील काळा पैसा जाहीर करून या योजने अंतर्गत अभय मिळवा. तुमच्या ठेवींची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. या योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडील काळा पैसा उघड करणाऱ्यांच्या बाबतीत संपूर्ण गोपनीयता बाळगली जाईल, असेही या जाहिरातीत म्हटले आहे.एका वरिष्ठ प्राप्तीकर अधिकाऱ्याने सांगितले की, नोटाबंदीच्या काळात बँकांत भरला जाणारा काळा पैसा नियमित करून घेण्यासाठी पीएमजीकेवाय योजना सरकारने घोषित केली होती. या योजनेत काळा पैसा उघड न करणाऱ्यांना १३७ टक्के दंड आकारला जाणार आहे. याशिवाय त्यांच्याविरुद्ध बेनामी कायद्याद्वारे कारवाई करायलाही विभाग कचरणार नाही. पीएमजीकेवाय योजनेत काळा पैसा जाहीर करणारांना ४९.९ टक्के कर द्यावा लागेल. या योजनेचा लाभ न घेता आपल्या आयकर विवरणपत्रात काळा पैसा दर्शविणाऱ्यांना ७७.२५ टक्के कर व दंड लागेल.
आता उलटी गणती सुरू!
By admin | Updated: March 25, 2017 00:01 IST