Join us

आता अर्धरब्बी पिकांचे करावे लागेल नियोजन

By admin | Updated: July 19, 2015 23:15 IST

यंदा पावसाने वेळेवर आणि बऱ्यापैकी सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी ७० टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत

अकोला : यंदा पावसाने वेळेवर आणि बऱ्यापैकी सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी ७० टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्याने विविध पिकांच्या उत्पादनात घट होण्याचीच शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आॅगस्टनंतरच्या आपत्कालीन पीक नियोजनावर भर दिला आहे. यंदा पाऊस वेळेवर सुरू झाला; पण त्यानंतर शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेला तोंड द्यावे लागले. पाऊस वेळेवर सुरू होऊन मध्येच मोठा खंड पडला. भारतीय हवामानशास्त्र विभागानेसुद्धा यापूर्वी व्यक्त केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार पावसाचा खंड पडला असून, अद्याप दमदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने कृषी विद्यापीठाने आॅगस्ट महिन्यात शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत, यासाठी नवीन आपत्कालीन पीक व्यवस्थापनाच्या शिफारसी केल्या आहेत.अशी परिस्थिती उद्भवल्यास कापसाची पेरणी करणे आता शक्य नसल्याचे केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने म्हटले आहे. याकरिता सुरुवातीपासून शेतकऱ्यांना पेरणी कशी करावी आणि लागवड पद्धतीत बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुंद-वरंबा-सरी पद्धतीने पिकाची लागवड केल्यास पावसाच्या पाण्याचे जलसंधारण होऊन, पावसाचा खंड पडल्यास पिकांना जमिनीत मुरलेल्या पावसाचा फायदा होतोे. धान पिकाची पेरणी झाली आहे; तथापि पुरक पाऊस नसल्याने रोवणीचे काम रखडले आहे. दरम्यान, ३० जुलैपर्यंत दमदार पावसाचे आगमन न झाल्यास पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना अर्धरब्बी पिकांचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी मका, बाजरी, सूर्यफुल आदी पिकांबाबत नव्याने विचार करावा लागेल, असे विद्यापिठाने स्पष्ट केले आहे.