Join us

करदात्यांच्या शोधासाठी आता ‘अ‍ॅप’

By admin | Updated: June 18, 2015 02:11 IST

करदायित्व असूनही कर भरणा न करणाऱ्या करदात्यांच्या शोधासाठी आता तंत्रज्ञानाची

मुंबई : करदायित्व असूनही कर भरणा न करणाऱ्या करदात्यांच्या शोधासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असून, याकरिता प्राप्तिकर विभागातर्फे एक विशेष अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वापरासाठी हे अ‍ॅप असेल व या अ‍ॅपमधील सर्च अथवा शोधाचा मुख्य पाया हा ग्राहकाचा पॅन क्रमांक असणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर करदाते शोधणे शक्य होणार आहे. जानेवारी २०१६ पर्यंत हे अ‍ॅप पूर्णपणे तयार होऊन त्याद्वारे काम सुरू होणार आहे. करदाते शोधण्यासाठी आधार कार्डाऐवजी पॅन कार्ड हा पायाभूत घटक मानण्यात आला आहे. यामुळे सर्वच पॅन कार्ड धारकांची माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होईल. एखाद्या व्यक्तीबद्दल काही टीप मिळाली अथवा काही अन्य माहिती असेल तर किंवा विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या पॅन कार्डाच्या यादीवर जरी क्लिक केले तरी , त्या अधिकाऱ्याला संबंधित पॅन कार्डधारकाची सर्व माहिती मिळेल. त्या ग्राहकाचे कोणत्या बँकेत खाते आहे, त्या खात्याद्वारे त्याने केलेले व्यवहार तसेच डेबिट अथवा क्रेडिट कार्डाद्वारे त्याने केलेले व्यवहार अशी सर्व माहिती मिळेल. याद्वारे आर्थिक कुंडलीद्वारे संबंधित व्यक्तीचे उत्पन्न, खर्च, करदायित्वाची पात्रता अशा विविध गोष्टी तपासता येतील.आता विविध मर्यादांच्या खरेदीसाठी पॅन सक्तीचे आहे. उदाहरणाने सांगायचे तर घराच्या व्यवहारात २० हजार रुपयांवरील व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचे आहे तर सोन्याच्या खरेदीत एक लाख रुपयांवरील पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर बँकेत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे भरायची असेल तरी पॅन कार्डाचा क्रमांक द्यावा लागतो. त्यामुळे देशात आधार कार्डापेक्षाही तूर्तास पॅन कार्डधारकांची संख्या मोठी आहे. तसेच, अन्य ओळखपत्रांच्या तुलनेत पॅन कार्ड काढण्याऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पॅन कार्ड आधारभूत मानून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)