Join us

डाळींनंतर आता तांदूळ महागण्याची चिन्हे

By admin | Updated: November 16, 2015 00:05 IST

डाळींनंतर आता तांदूळ महाग होण्याची चिन्हे आहेत. गोदामातील कमी साठा आणि खरीप हंगामातील कमी उत्पादनामुळे तांदळाचे भाव वाढू शकतात

नवी दिल्ली : डाळींनंतर आता तांदूळ महाग होण्याची चिन्हे आहेत. गोदामातील कमी साठा आणि खरीप हंगामातील कमी उत्पादनामुळे तांदळाचे भाव वाढू शकतात, असे उद्योग मंडळ असोचेमने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र हा अहवाल बाजारातील तांदळाच्या सध्याच्या किमतीशी न जुळणारा आहे. कारण सध्या बासमती तांदूळ बाजारात गेल्या वर्षीच्या भावापेक्षा २५ ते ३० रुपये किलोने स्वस्त आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या प्रिमियम बासमती तांदळाचा भाव गेल्या वर्षीच्या भावापेक्षा ३० टक्क्यांनी स्वस्त होऊन ४४-४५ रुपये किलोग्रॅम आहे. गेल्या वर्षी हा भाव ६२ ते ६५ रुपये होता.अहवालात म्हटले आहे की, योग्य ते उपाय जर केले गेले नाहीत तर डाळी, कांदे, मोहरीच्या तेलानंतर तांदळाचे भाव ग्राहकाचा खिसा खाली करू शकतील. येत्या काही महिन्यांत तांदळाचे भाव वाढू शकतात. सरकारी माहितीनुसार २०१५-२०१६ या पीक वर्षात तांदळाचे उत्पादन ९.०६ कोटी टन असेल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र व कर्नाटकात पाऊस कमी झाल्यामुळे हे ९.०६ कोटी टन उत्पादन मिळणे अशक्य दिसत आहे. जास्तीत जास्त उत्पादन ८.९ कोटी टन असेल. २०१५-२०१६ मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन १०.३ कोटी टनांचे असेल.