Join us

विनाअनुदानित गॅस ११३ रुपयांनी स्वस्त

By admin | Updated: December 2, 2014 00:12 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती गेल्या अनेक वर्षांतील नीचांकावर आल्यामुळे स्वयंपाकाचा विनाअनुदानित गॅस सिलिंडरही ११३ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती गेल्या अनेक वर्षांतील नीचांकावर आल्यामुळे स्वयंपाकाचा विनाअनुदानित गॅस सिलिंडरही ११३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. विमानाचे इंधनही ४.१ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी येथे १४.२ किलोचे गॅस सिलेंडर ८६५ रुपयांवरून ७५२ रुपयांना मिळेल, असे जाहीर केले.गॅस सिलेंडरचा भाव हा बाजारपेठेतील किमतीच्या चढ-उतारावर निश्चित होतो. या सिलेंडरच्या भावात गेल्या आॅगस्टपासून घट होण्याची ही पाचवी वेळ आहे. अनुदानित १२ सिलेंडरची मर्यादा संपल्यानंतर ग्राहक हे विनाअनुदानित सिलेंडर घेतात. आॅगस्टपासून या सिलेंडरच्या किमतीत एकूण १७०.५ रुपये घट झाली आहे. विमानाच्या इंधनाचा दर दिल्लीत २,५९४.९३ रुपये लिटर किंवा ४.१ टक्क्यांनी ते स्वस्त होऊन ५९,९४३ रुपये प्रति किलोमीटर असा झाला आहे. दर कमी होण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. यापूर्वी विमानाच्या इंधनाचे दर एक नोव्हेंबर रोजी ७.३ टक्क्यांनी (४,९८७.७ रुपये प्रति किलोमीटर) कमी झाले होते.विमान कंपनीच्या एकूण खर्चात ४० टक्के खर्च हा इंधनावर होत असतो. रोख रकमेची टंचाई असलेल्या विमान कंपन्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळेल. इंधन दर घटल्यामुळे प्रवाशांनाही तिकीट स्वस्तात मिळेल का, याबद्दल विमान कंपन्यांनी सध्या कोणतेही भाष्य केलेले नाही. तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोलचा दर ९१, तर डिझेलचा भाव ८४ पैसे प्रतिलिटरने घटवला होता. डिझेलच्या किमतीत एकाच महिन्यात तीन वेळा घट होऊन आता ५२.५१ रुपये प्रतिलिटर झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)