Join us  

स्पेक्ट्रम रिन्यू करण्याची योजना नाही, Vi नं 3G सेवा केल्या बंद; आता 5G सेवेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:15 AM

कंपनीने आधीच अनेक क्षेत्रांमध्ये 3G सेवा बंद केली आहे

व्होडाफोन आयडियानं (Vodafone Idea) काही भागात 900MHz आणि 1800MHz बँड्समधील स्पेक्ट्रमचं नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. Vi च्या नव्या नेटवर्क तंत्रज्ञानाशी सुसंगत नसल्याचं सांगत हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने आधीच अनेक क्षेत्रांमध्ये 3G सेवा बंद केली आहे आणि 3G उपकरणांच्या वापरात घट झाल्यामुळे ती हळूहळू इतर भागात बंद करण्याची कंपनीची योजना आहे. फंडिंग मिळाल्यानंतर सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत 5G सेवा सुरू करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे, तसंच सुरुवातीच्या 24-30 महिन्यांमध्ये महसूल मिळवून देणाऱ्या 40 टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत, व्होडाफोन आयडियाचा 3G नेटवर्क पूर्णपणे बंद करण्याचा आणि 4G नेटवर्क क्षमता वाढवण्यासाठी 2100 MHz बँडचा पुन्हा वापर करण्याचा मानस आहे. 

आर्थिक अडचणीतून जात असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया गुंतवणूकदारांकडून 1 बिलियन डॉलर्स (8,300 कोटी रुपये) उभारणार आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी सांगितलं की कंपनीला या प्रकरणासाठी गुंतवणूकदारांकडून कमिटमेंटही मिळाली झाली आहे. 

व्होडाफोन आयडियानं इक्विटी आणि डेटच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली होती. मंजूर रकमेपैकी 20,000 कोटी रुपये इक्विटी किंवा इक्विटी लिंक्ड इन्स्ट्रुमेंट्समधून उभारले जातील. 

भागधारकांची मंजुरी घेणार 

व्होडाफोन आयडिया 2 एप्रिल रोजी भागधारकांची मंजुरी घेणार आहे. भांडवल उभारणीची प्रक्रिया येत्या तिमाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. "सरकार व्होडाफोन आयडियाच्या प्रवर्तकांकडून भांडवलासह 45,000 कोटी रुपये इक्विटी आणि डेट उभारण्याच्या योजनेला पाठिंबा देईल. सरकारनं कंपनीला पाठिंबा देण्यासाठी आतापर्यंत सर्व शक्य उपाययोजना केल्या आहेत," अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)सरकार