Join us  

नितीन गडकरी बनले गायीच्या शेणापासून पेंट तयार करणाऱ्या कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 8:56 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नैसर्गिक पेंटच्या (Khadi Prakritik Paint) ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून देशभरात गायीच्या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या या पेंटचा वापर वाढावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नैसर्गिक पेंटच्या (Khadi Prakritik Paint) ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून देशभरात गायीच्या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या या पेंटचा वापर वाढावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.  देशातील पेंट निर्मात्या कंपन्यांनी गायीच्या शेणापासूनच्या पेंटचं उत्पादन करावं यासाठी ते कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहेत. जयपूरमध्ये आयोजित नैसर्गिक पेंटच्या नव्या युनिटचं उदघाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून आयोजित कार्यक्रमात करण्यात आलं. ( Nitin gadkari appointed Brand Ambassador of Khadi Prakritik Paint)

गायीच्या शेणापासून निर्माण केल्या जाणाऱ्या पेंटमुळे देशातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्रावरील आधारित अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरेल, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. 

"लाखो कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाच्या उदघटनापेक्षा या नैसर्गिक पेंटच्या निर्मितीच्या युनिटचं उदघाटन कितीतरी पटीनं अधिक सुख आणि समाधान देणारं आहे. या पेंटमुळे समाजातील तळागळातील गरीब व्यक्तीलाही याचा लाभ होणार असून विकासाच्या व्यापक संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गावागावात कमीतकमी एक तरी अशापद्धतीचा पेंट निर्मिती करणारं युनिट असावं हे लक्ष्य घेऊन काम करायला हवं", असं नितीन गडकरी म्हणाले. 

उत्पादन क्षमता दुपटीनं वाढणारगायीच्या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या पेंटचं नवं युनिट खादी ग्रामद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्था (केएनएचपीआय) जयपूर येथे उभारण्यात आलं आहे. नव्या युनिटमुळे नैसर्गिक पेंटच्या उत्पादनाची क्षमता दुप्पट होणार आहे. सध्याच्या घडीला या नैसर्गिक पेंटचं दैनंदिन उत्पादन ५०० लीटर इतकं आहे. त्यात आता वाढ होऊन दैनंदिन पातळीवर १००० लीटर इतकं उत्पादन होणार आहे. नवं युनिट हे अत्याधुनिक यंत्रांनी सज्ज असून गुणवत्ता आणि एकरुपतेची सर्व मानकं पाळली जातील अशापद्धतीचं अत्याधुनिक पद्धतीनं उत्पादन केलं जाणार असल्याचं खादी आणि ग्रामद्योग आयोगचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितलं. 

टॅग्स :नितीन गडकरीव्यवसाय