नवी दिल्ली : लाफार्जहोल्सिम लि. या जगातील सर्वात मोठ्या सीमेंट उत्पादक कंपनीच्या लाफार्ज इंडिया या उपकंपनीचा भारतातील काही व्यवसाय अहमदाबाद येथील साबण व डिटर्जंट उत्पादक निरमा कंपनी १.४ अब्ज डॉलरना (९,४७८ कोटी रु) विकत घेणार आहे.लाफार्ज इंडियाच्या छत्तीसगढ व झारखंडमधील तीन सीमेंट कारखाने व दोन ग्रायंडिंग प्लांटच्या विक्रीसाठी लंडनमध्ये झालेल्या बोलींमध्ये निरमा कंपनीने सर्वोच्च बोली दिली व ती स्वीकरण्यात आल्याचे लाफार्जहोल्सिम कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले. राकेश पटेल आणि हिरेन पटेल या दोन भावांच्या निरमा कंपनीने या बोलींमध्ये अजय पिरामल यांची पिरामल एन्टरप्रायजेस व सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू सिमेंट या कंपन्यांना मागे टाकले.हा व्यवहार ‘एंटरप्राईज व्हॅल्यू’ या तत्त्वावर होणार असून तोयेत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. (लोकमत न्यूज नेटर्क)सर्वात मोठी सिमेंट कंपनी लाफार्ज या फ्रेंच आणि होल्सिम या स्विस कंपन्यांचे विलिनिकरण झाल्यावर जागतिक पातळीवर लाफार्जहोल्सम ही सर्वात मोठी सिमेंट कंपनी स्थापन झाली. लाफार्ज इंडियावर कर्जाचा बराच बोजा असल्याने ही उपकंपनी पूर्णपणे विकण्याचे आधी ठरले. पण तसे झाले असते तर विकत घेणाऱ्या कंपनीची मक्तेदारी निर्माण झाली असती म्हणून मक्तेदारी आयोगाने त्यास आक्षेप घेतला. त्यामुळे उपर्युक्त तीन कारखाने व दोन ग्रायडिंग प्लांट एवढाच व्यवसाय विकण्याचे ठरविण्यात आले. हा व्यवसाय विकल्यानंतरही एसीसी व अंबुजा सिमेंटच्या रूपाने लाफार्फ इंडियाचा भारतातील व्यवसाय सुरु राहील.
लाफार्ज सीमेंटसाठी निरमाची बोली ९,४७८ कोटींची
By admin | Updated: July 12, 2016 00:20 IST