Join us  

एेतिहासिक! निफ्टीची विक्रमी झेप, पहिल्यांदाच स्थिरावला 10 हजारावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 5:39 PM

शेअर मार्केटसाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने पहिल्यांदाच 10 हजाराचा विक्रमी आकडा पार केला आहे.

मुंबई, दि. 26 -  शेअर मार्केटसाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने पहिल्यांदाच 10 हजाराचा विक्रमी आकडा पार केला आहे. मंगळवारप्रमाणे आजही शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली आणि पहिल्यांदाच 10 हजार 20 या एेतिहासिक आकड्यावर निफ्टी बंद झालं. निफ्टीने 56.10 अंकांची झेप घेतली. रिलायन्स आणि वेदांताच्या चांगल्या  तिमाही निकालामुळे मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बीएसईच्या निर्देशांकातही 154.19 अंकांची वाढ पाहायला मिळाली, यासह  32,382  या आकड्यावर बीएसई बंद झालं. येत्या काही दिवसांमध्येही सेन्सेक्समध्ये तेजी दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारीही केला होता 10 हजाराच्या आकड्याला स्पर्श-ब्लू-चीप कंपन्यांचा उत्तम तिमाही निकाल आणि देशाच्या अनेक भागांत अग्रेसर असलेला मान्सून यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मंगळवारी १० हजार अंकांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्स ऐतिहासिक उंचीवर पोहोचला होता. तथापि, नफा वसुलीमुळे दोन्ही निर्देशांक नंतर घसरणीसह बंद झाले.मजबूत वाढीच्या बळावर निफ्टी १०,०११.३० या अंकावर पोहोचला होता. इतिहासात पहिल्यांदाच तो १० हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता. त्यानंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाले आणि निर्देशांक घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस निफ्टी १.८५ अंकाच्या घसरणीसह ९,९६४.५५ अंकावर बंद झाला.विदेशी संस्थांची जोरदार खरेदी आणि मान्सूनचा देशाच्या अनेक भागांतील जोर यामुळेही बाजारात उत्साह होता, असे सूत्रांनी सांगितले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२,३७४.३० अंकांपर्यंत वर चढला होता. नंतर मात्र तो १७.६० अंकांच्या घसरणीसह ३२,२२८.२७ या अंकावर बंद झाला.