Join us

नववर्षात अच्छे दिन नव्हे , वाहनं महागणार

By admin | Updated: December 30, 2014 18:05 IST

नववर्षात अलिशान गाडी घरासमोर उभी करण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - नववर्षात अलिशान गाडी घरासमोर उभी करण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे. मोदी सरकारने वाहनांवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्यूटी) सवलत देण्याचा युपीए सरकारचा निर्णय रद्द केला आहे. यामुळे नववर्षापासून वाहनखरेदी महागणार आहे. 
 
युपीए सरकारने मांडलेल्या हंगामी अर्थ संकल्पामध्ये भारतातील ऑटोमोबाईल सेक्टरला गती देण्यासाठी उत्पादन शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार, एसयूव्ही आणि दुचाकी गाड्यांच्या दरात कपात झाली होती. याचा फायदा देशातील ऑटो उद्योजकांनाही झाला होता. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर याकालावधीत तब्बल १ कोटी ३३ लाख गाड्यांची खरेदी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन खरेदीमध्ये यंदा १० टक्क्यांनी वाढ झाली होती. मेमध्ये केंद्रात सत्तेवर येताच मोदी सरकारने उत्पादन शुल्कात सुट देण्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढवून दिली. मात्र आता मोदी सरकारने ३१ डिसेंबरापासून उत्पादन शुल्कावर दिली जाणारी सुट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमती वाढणार आहेत. नववर्षात ग्राहकांना २० ते २७ टक्क्यांऐवजी २४ ते २७ टक्के ऐवढे उत्पादन शुल्क भरावे लागतील.