Join us

बुटीबोरी वसाहतीत ३३ केव्हीचे नवीन उपकेंद्र

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST


- विद्युत पुरवठ्याचा दर्जा वाढणार : उद्योगांना अधिकार मिळणार
नागपूर : बुटीबोरी उद्योग वसाहतीत विद्युत पुरवठ्याचा दर्जा वाढविण्यासाठी ३३ के.व्ही. क्षमतेचे नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात बुधवारी झालेल्या बैठकीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, हिंगणा व एमआयडीसी असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तसेच जिल्ह्यातील इतर औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत क्षेत्राचा विकास आणि उद्योजकांच्या प्रश्नावर चर्चा झाली. बुटीबोरी व हिंगणाा परिसरात कामगार व उद्योजकांच्या सेवेसाठी एसटी व स्टारबस सेवा सुरू करण्यात येणार आहे. समितीच्या पाठपुराव्यामुळे कामगारांच्या वैद्यकीय उपचारांच्या प्रलंबित दाव्यांची संख्या कमी झाली आहे. स्थानिक स्तरावर २५ हजारापर्यंतचे दावे मंजुरीचे अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे कृष्णा म्हणाले.
मोठ्या आजारी उद्योगांना मिळणाऱ्या सवलती छोट्या उद्योगांना लागू करणे तसेच छोट्या उद्योगांना आजारी घोषित करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात येणार आहे. औद्योगिक वापराकरिता बिगर शेती परवानगी मिळण्याबाबतच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या कार्यपद्धतीबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचे सांगून उद्योग संघटनांनी याबाबत येत्या आठ दिवसाच्या आत सूचना देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.