Join us  

संवेदनशील निर्देशांकाची नवीन उच्चांकी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:20 AM

सकारात्मक वातावरणामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने नवीन उच्चांकी झेप घेतली आहे.

-प्रसाद गो. जोशीदेशांतर्गत आर्थिक वातावरण फारसे चांगले नसले, तरी विविध आस्थापनांनी नोंदविलेले चांगले निकाल, अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेली सुधारणा, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध भडकण्याची कमी झालेली शक्यता, अशा सकारात्मक वातावरणामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने नवीन उच्चांकी झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही ११ हजारांचा टप्पा पार करता आला.गत सप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजारामध्ये तेजीचाच माहोल दिसून आला. अखेरच्या दिवशी नफा कमाविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे निर्देशांक काहीसे खाली आले. तत्पूर्वी गुरुवारी संवेदनशील निर्देशांकाने ३६६९९.५३ अशी आतापर्यंतची सर्वाेच्च कामगिरी नोंदविली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ३६५४१.६३ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात ८८३.७७ अंशांची वाढ झाली.राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजी होती. निफ्टी हा तेथील निर्देशांकही २४६.२५ अंशांनी वाढून ११०१८.९० अंशांवर बंद झाला. यानिर्देशांकाला ११ हजारांची पातळी ओलांडण्यात आलेले यश हे निश्चितच अभिनंदनीय आहे. बाजारामधील उलाढाल मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसून आली.गेले काही महिने सातत्याने घसरत असलेले मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक गत सप्ताहामध्ये वाढलेले दिसून आले. मिडकॅप निर्देशांकामध्ये ३९.८५ अंशांनी वाढ होऊन तो १५४३१.४७ अंशांवर बंद झाला. त्यामानाने स्मॉलकॅपमध्ये १३६.३९ अंश अशी चांगली वाढ झाली. हा निर्देशांक १६१९६.३३ अंशांवर बंद झाला.मे महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये ३.२ टक्क्यांनी घट झाली, तसेच ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढही झाली. मात्र, विविध आस्थापनांचे जाहीर झालेले चांगले तिमाही निकाल आणि आंतरराष्टÑीय बाजारामधील आशादायक वातावरण, यामुळे भारतीय बाजारामध्ये वाढ झालेली दिसून आली. तेजीच्या वारूवर बाजारात उच्चांकही झाला.>सोन्याच्या आयातीमध्ये २५ टक्क्यांनी घटचालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये देशातील सोन्याच्या आयातीमध्ये सुमारे २५ टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये ८.४३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या सोन्याची आयात झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. गत वर्षीच्या याच तिमाहीमध्ये ११.२६ अब्ज अमेरिकन डॉलरचे सोने आयात केले गेले होते.देशांतर्गत आणि आंतरराष्टÑीय बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये घट होत असल्याने भारतामधील या धातूची आयात कमी झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यापासूनच भारतामधील सोन्याची आयात कमी होत असलेली दिसून आली आहे.भारत हा सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. देशातील दागिने बनविणाऱ्या उद्योगाकडून सोन्याची आयात केली जाते. सोने आयात कमी होत असल्याने देशाच्या चालू खात्यावरील तूट कमी झाली आहे.

टॅग्स :निर्देशांक