Join us

नेपाळची अर्थव्यवस्था भूकंपात पूर्णत: उद्ध्वस्त

By admin | Updated: May 1, 2015 23:41 IST

महाभयंकर भूकंपामुळे नेपाळची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. या महाकठीण कामासाठी नेपाळला परराष्ट्रांकडून आणि जगात वेगवेगळ्या

काठमांडू : महाभयंकर भूकंपामुळे नेपाळची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. या महाकठीण कामासाठी नेपाळला परराष्ट्रांकडून आणि जगात वेगवेगळ्या देशांत राहणाऱ्या नेपाळी नागरिकांकडून मदतीची आशा आहे. भूकंपाने अनेक शहरे आणि गावांना जमीनदोस्त केले आहे.२५ एप्रिल रोजीच्या या भूकंपाने किमान ६ हजार लोकांचा बळी घेतला असून १० हजारांपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार नेपाळच्या अर्थव्यवस्थेचे लाखो अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोसळला असून तो कधी सक्रिय होईल हे कोणालाही माहिती नाही. आयएचएसचे (आशिया प्रशांत) अर्थतज्ज्ञ राजीव विश्वास म्हणाले की, ‘भूकंप खूपच विनाशकारी होता व आमचा उद्योग पूर्णपणे बंद पडला आहे. नेपाळमध्ये पर्यटक पुन्हा कधी येतील हे मला माहिती नाही.’ नेपाळमध्ये पुनर्निर्माण कामासाठी ५ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त खर्च होईल. ही रक्कम नेपाळच्या अर्थव्यवस्थेच्या २० टक्के आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सेवा विभागाने भूकंपाने एक ते १० अब्ज डॉलरचे नुकसान केल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी इतर विश्लेषकांनी आताच सगळ्या नुकसानीचा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असे म्हटले.आशियायी विकास बँकेने (एडीबी) दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये पर्यटन व्यवसायातून ७ टक्के रोजगार उपलब्ध होतो व त्याचा अर्थव्यवस्थेतील वाटा हा ८ टक्क्यांचा आहे. गेल्यावर्षी नेपाळमध्ये ८ लाख पर्यटक आले होते. पर्यटनचा हंगाम नेपाळमध्ये सुरू असतानाचा भूकंपाचे संकट आले व युनेस्कोने जाहीर केलेली सहा जागतिक वारसा स्थळे नष्ट झाली आहेत. भूकंपाने माऊंट एव्हरेस्टवरही हिमकडे कोसळून १९ जण ठार झाले. (वृत्तसंस्था)