Join us  

नीरव मोदीच्या बहिणीला बजावली रेड कॉर्नर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 11:47 PM

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीची बहीण पूर्वी दीपक मोदी (४४) हिच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीची बहीण पूर्वी दीपक मोदी (४४) हिच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.बेल्जियमची नागरिक असलेली पूर्वी मोदी फरार आहे. पीएनबी घोटाळ्यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप तिच्यावर आहे. रेड कॉर्नर नोटीस ही आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटच असते. पूर्वी मोदी हिच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केली होती. पीएनबी घोटाळ्यात मार्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रात पूर्वीचे नाव होते. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत केलेल्या घोटाळ्यातील पैशाचे लाँड्रिंग केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.नीरव मोदीचा अमेरिकेतील व्यावसायिक भागीदार मिहीर भन्साळी याच्याविरुद्धही इंटरपोलने अलीकडेच रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्याच्यावरही मनीलाँड्रिंगचेच आरोप आहेत. स्वत: नीरव मोदीविरुद्धही रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी लेटर्स आॅफ अंडरटेकिंग आणि लेटर्स आॅफ क्रेडिट या माध्यमातून १४ हजार कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला आहे. दोघेही जानेवारी २0१८ पासून फरार आहेत.चोकसीप्रकरणी स्मरणपत्रमेहुल चोकसी याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात यावी, यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) इंटरपोलला स्मरणपत्र पाठविले आहे.

टॅग्स :नीरव मोदीपंजाब नॅशनल बँक घोटाळा