Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपातही राष्ट्रीयीकृत बँका फायद्यातच!

By admin | Updated: November 24, 2014 01:50 IST

संप म्हटला की आर्थिक नुकसान, हे समीकरण ठरलेले आहे; मात्र १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपामुळे बँका तोट्यात नव्हे तर फायद्यातच राहिल्या आहेत.

राम देशपांडे, अकोला संप म्हटला की आर्थिक नुकसान, हे समीकरण ठरलेले आहे; मात्र १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपामुळे बँका तोट्यात नव्हे तर फायद्यातच राहिल्या आहेत. हो, त्याला कारणही तसेच आहे. संपात सहभाग नोंदविणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून एक दिवसाचा पगार वजा होणार असून, ही रक्कम जवळपास १२0 कोटी रुपयांपर्यंत राहणार आहे.पगारवाढ, खाजगीकरण, विलीनीकरण, एफडीआयचा शिरकाव आणि कर्जबुडव्यांवर कारवाई करून कर्ज वसूल करणे आदी मागण्यांसाठी १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला होता. गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्यांच्या पूर्ततेसाठी देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये काम करणाऱ्या १० लाख कर्मचाऱ्यांनी २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन आर्थिक वर्षात तब्बल १३ वेळा संप पुकारला. १२ नोव्हेंबर रोजी याच कारणांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात देशातील १० लाख राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातील ३० हजार कर्मचारी सहभागी झाले होते. एकट्या अकोला जिल्ह्यातून २ हजार कर्मचारी यात सहभागी झाले होते.ट्रेड युनियन अ‍ॅक्टनुसार बँकिंग क्षेत्रातील कामगारांना संप पुकारण्याचा अधिकार असला तरी, संपात प्रत्यक्ष सहभाग नोंदविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार त्याच्या महिन्याच्या पगारातून वजा केला जातो. बँक कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार सरासरी १२00 रुपये एवढा आहे. त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी संपावर असलेल्या देशातील १0 लाख कर्मचाऱ्याऱ्यांकडून १२0 कोटी रुपये पगार कपात होणार आहे.