Join us  

पंजाब नॅशनल बँकेत नवीन घोटाळा, भूषण पॉवरने ३८००कोटींचा गंडा घातल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 11:39 AM

भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड कंपनीने तब्बल ३,८००कोटींचा घोटाळा केला आहे, अशी तक्रार पीएनबीकडूनच भारतीय रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : ११, ४०० कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी आणि त्याचे साथीदार देशाबाहेर पसार झाले असतानाच आता पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) दुसऱ्या घोटाळ्याच्या कचाड्यात सापडली आहे. देशातील नामांकित बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पीएनबीमध्ये आणखी एक घोटाळा समोर आला आहे. भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड(बीपीएसएल) कंपनीकडून ३,८०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पीएनबीकडून सांगण्यात येत आहे.

भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड कंपनीने तब्बल ३,८००कोटींचा घोटाळा केला आहे, अशी तक्रार पीएनबीकडूनच भारतीय रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली आहे. पीएनबीकडून फॉरेंसिक ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेसह शेअर मार्केटला यासंबंधी सूचना दिली आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. भूषण पावर अँड स्टील लिमिटेड कंपनी आधीच कर्जबाजारी झाली असून कंपनीने पीएनबीत पैशाची मोठी अफरातफर त्यांनी केली असल्याचा आरोप केला जात आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदीने पीएनबीत घोटाळा केल्याचे प्रकरण ताजे असताना आता हे नवीन प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नीरव मोदी यांनी पीएनबीला ७ हजार ३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश काल कर्ज वसुली न्यायाधिकरनचे  पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत. मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी  पीएनबीच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल ११, ४०० कोटींचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे.  

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळापंजाब नॅशनल बँकनीरव मोदी