मुंबई - प्राप्तिकरात सूट देण्याचे अतिरिक्त कवच प्राप्त झाल्यानंतर अधिकाधिक गुंतवणूकदारांपर्यंत झपाट्याने पोहोचण्यासाठी सरकारच्या बहुचर्चित राष्ट्रीय पेन्शन योजनेचे एक पाऊल पुढे पडत असून लवकरच इंटरनेटच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेणे गुंतवणूकदारांना शक्य होणार आहे.नुकत्याच मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी प्राप्तिकराच्या रचनेत कोणताही बदल केला नाही; मात्र गुंतवणूकदारांना कर बचतीसाठी अतिरिक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पेन्शन योजनेला प्राप्तिकराच्या कलम ८० सीसी या मर्यादेतून बाहेर काढत ८० डीडी या कलमात समावेश करीत वजावट उपलब्ध करून दिली.देशाच्या बचतीच्या दरातही मोठी घट झाल्याचे यावेळी वित्तमंत्र्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीच्या दीर्घकालीन साधनाची लोकप्रियता वाढविण्यावर भर देण्याचे संकेत सरकारने दिले होते. याचाच भाग म्हणून आता सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. ही योजना आॅनलाईन सुरू झाल्यास गुंतवणूकदाराला त्याच्या नेट बँकिंगच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होता येईल आणि योजनेच्या नियमानुसार गुंतवणूकदारांना आॅनलाईन पैसे भरणेही शक्य होईल. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय पेन्शन योजना लवकरच होणार आॅनलाईन!
By admin | Updated: May 5, 2015 22:31 IST