मुंबई : जास्त जोखीम जास्त परतावा या सूत्राची सर्वात जास्त प्रचीती देणाऱ्या इक्विटी योजनांकडेच म्युच्यअल फंडांचा ओढा असून नोव्हेंबर २०१५ या महिन्यात इक्विटी योजनेत सुमारे ६३०० कोटी रुपयांची गुंतवणूक होत, या योजनेतील गुंतवणुकीने आता ८७ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.म्युच्युअल फंड कंपन्यांतर्फे भांडवली बाजारात जी गुंतवणूक होत असते, त्यातील सर्वात जोखमीची गुंतवणूक म्हणून इक्विटी प्रकाराकडे पाहिले जाते. मंदीचे सावट उठल्यानंतर आणि सप्टेंबर २०१३ पासून म्युच्युअल फंड कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर इक्विटी योजनांत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना सरासरी १२ ते २३ टक्क्यांच्या दरम्यान परतावा मिळाला आहे. परताव्याचे प्रमाण लक्षात घेत अनेक गुंतवणूकदारांनी इक्विटी योजनांनाच पसंती दिल्याचे दिसून आले. उपलब्ध माहितीनुसार,२०१४ मध्ये या योजनांत ४९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर यंदाच्यावर्षी, या योजनेत जवळपास पाऊणपट गुंतवणूक होत हा आकडा ८७ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, म्युच्यअल फंड कंपन्यांच्या विविध उत्पादनांचा विचार करता आणि अर्थकारणातील सुधारामुळे पुन्हा गुंतवणूकदारांची वाढती संख्या विचारात घेता चालू वर्षात आतापर्यंत या कंपन्यांच्या एकत्रित व्यवस्थापनाखालील मालमत्तेने १३ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. (प्रतिनिधी)
म्युच्युअल फंडांची पसंती इक्विटीला
By admin | Updated: December 6, 2015 22:41 IST