Join us

वरोर्‍यातील बेपत्ता शिक्षिकेचा खून करुन मृतदेह जाळला

By admin | Updated: September 29, 2014 21:47 IST


वरोरा : गेल्या आठ दिवसांपासून शहरातून बेपत्ता झालेल्या शिक्षिकेचा मृतदेह वाशिम जिल्ह्यातील जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षिकेचा खून करून नंतर तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे.
माया योगेश खैरे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. वरोरा येथून मारेगाव (जि. यवतमाळ) तालुक्यातील कोसारा येथील शाळेत त्या दररोज स्कूटरने जात होत्या. २० सप्टेंबरला त्या शाळेत गेल्यानंतर परतल्याच नाहीत. त्यांच्या मुलांनी मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडेही शोध घेतला होता. अखेर त्यांनी वरोरा पोलिसांत तक्रार दिली.
चौकशीदरम्यान, वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरव्हा गावाच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. तो खैरे यांचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. प्रथम खैरे यांचा गळा आवळून त्यांना ठार करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जंगलात नेण्यात आला. तेथे पेट्रोल टाकून तो जाळल्याची माहिती मानोरा पोलिसांनी दिली. पोलिसांनी मारुती व्हॅन, पेट्रोलसाठी वापरण्यात आलेल्या दोन रिकाम्या बाटल्या जप्त केल्या. या खून प्रकरणात तीन ते चार व्यक्तींसह एका महिलेचाही समावेश असल्याचा संशय तपास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)