अकोला : कर्तव्यतत्पर असल्याचा डंका मिरवणार्या मनपा प्रशासनाची भूमिका अतिक्रमणासंदर्भात दुटप्पी असल्याचे समोर आले आहे. रस्त्यालगत साहित्य विक्री करून संसाराचा गाडा हाकणार्या अतिक्रमकांची हकालपी करणारे आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर चक्क रस्त्याच्या मधोमध अतिक्रमित घर थाटणार्या मनपातील महिला कर्मचार्याची पाठराखण करीत आहेत. क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे व नगर रचना विभागातील उपअभियंता राजेंद्र टापरे यांनी अद्यापही संबंधित अतिक्रमकाला नोटीस बजावल्या नसल्याची माहिती सोमवारी उजेडात आली. शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा गाजावाजा करीत मनपा आयुक्त डॉ.महेेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २६ जूनपासून शहरातील अतिक्रमण काढण्याला सुरुवात केली. कारवाईदरम्यान कोणताही भेदभाव होणार नाही, असे स्पष्ट करणार्या प्रशासनाने एक नव्हे तर अनेक ठिकाणी काही अतिक्रमकांवर कारवाईच केली नाही. यासंदर्भात उपायुक्त चिंचोलीकरांनी भेदभाव झाला नसल्याची पुष्टी केली असली तरी वस्तुस्थिती निराळी असल्यामुळेच अकोलेकरांमध्ये असंतोष निर्माण झाला. मुख्य रस्त्यालगत विविध साहित्याची विक्री करून पोटाची खळगी भरणार्या अतिक्रमकांची हकालपी करण्यात प्रशासनाने धन्यता मानली. पांढरपेशा नागरिकांच्या तक्रारीवरून ही जुजबी कारवाई करण्यात आली. दुसरीकडे स्वच्छ प्रशासनाचा दावा करणारी महापालिका त्यांच्या कर्मचार्यांनी थाटलेल्या अतिक्रमणाला मात्र पाठीशी घालून अकोलेकरांसमोर आदर्श निर्माण करीत आहे. मनपामध्ये मानधन तत्त्वावर कार्यरत सुनीता मोरे नामक महिला कर्मचार्याने बिर्ला रोड परिसरातील रामदूत अपार्टमेंटलगत चक्क रस्त्यावर घर उभारले. यामुळे रामदूत अपार्टमेंटमधील रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून यासंदर्भात नागरिकांनी मनपाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने उपायुक्त चिंचोलीकर, क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, राजेंद्र घनबहाद्दूर, विष्णू डोंगरे यांनी अतिक्रमित घराची पाहणी केली. त्यानंतर कोठे माशी शिंकली देव जाणे, कर्तव्याचे गोडवे गाणार्या प्रशासनाने अद्यापपर्यंतही अतिक्रमित घराला हटवले नाही. एकीकडे आयुक्तांच्या आदेशानुसार क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे यांनी १६ सप्टेंबर रोजी अतिक्रमकाला नोटीस जारी करीत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर दुसरीकडे उपअभियंता राजेंद्र टापरे यांनी अद्यापही नोटीस जारी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच, प्रशासनाची टोलवाटोलवी पाहता गोरगरिबांच्या घरावर जेसीबी चालविणारे प्रशासन कर्मचार्यांच्या अतिक्रमणाला पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात आयुक्तांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
अतिक्रमण करणार्या मनपा कर्मचार्यांना आयुक्तांचे अभय मनपा दुटप्पी; रस्त्यालगतच्या अतिक्रमकांवर घाला
By admin | Updated: September 23, 2014 00:14 IST