मुंबई : कॅपिटल गुडस्, रियल्टी, ऊर्जा आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची मागणी वधारल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७६ अंकांनी वाढून नव्या उच्चांकावर पोहोचून बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा २३.५० अंकांनी वाढून ७,२७६.४० या नव्या उच्चांकावर बंद झाला. यापूर्वी २० मे रोजी निफ्टी २,२७५.५० या उच्चांकावर बंद झाला होता. ३० कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स मजबुतीसह उघडताक्षणी २४,५२४ या सत्रातील उच्चांकावर पोहोचला. भांडवलाचा ओघ वाढल्याने व नव्या सरकारकडून आर्थिक वृद्धिकरिता ठोस पाऊल उचलण्याच्या अपेक्षेमुळे सेन्सेक्स झळाळला; परंतु माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये नफाखोरी वाढल्याने फायदा मर्यादित राहिला. अखेरीस बाजार ७६.३८ अंकांनी वाढून बंद झाला. रिझर्व्ह बँकेने सोन्यावरील आयात शुल्कात शिथिलता आणल्याने दागदागिने उत्पादन करणार्या कंपन्यांचे शेअर्सही तेजीत होते. केंद्रीय बँकेने बँकांव्यतिरिक्त निवडक व्यापारी परिवारांना सोने आयातीची परवानगी दिली. त्यामुळे टायटन, गीतांजली जेम्स व राजेश एक्सपोर्टसचे शेअर्स उसळले. त्याचबरोबर पीसी ज्वेलर, त्रिभुवनदास भीमजी झवेरी व श्रीगणेश ज्वेलरी हाऊसचे शेअर्सही चढे राहिले. (प्रतिनिधी)
मुंबई शेअर बाजार पुन्हा वधारला
By admin | Updated: May 23, 2014 01:38 IST